|| रवींद्र पाथरे

इशारों इशारों में :- नवरा-बायकोचं परस्परांवर निरतिशय प्रेम आहे, उभयतांचा संसार छान सुखाचा चाललाय, त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम्स नाहीएत… असं असताना त्यांना घटस्फोट हवा असेल तर तुम्ही काय म्हणाल? ह्यांचं डोकंबिकं फिरलंय की काय? हो, ना! ‘इशारों इशारों में’ नाटकातील नायक संजय जेव्हा मॅरेज कौन्सेलरकडे जाऊन हे असं सारं सांगतो तेव्हा त्यांनाही नेमका हाच प्रश्न पडतो : ‘एवढं सारं छान चाललेलं असताना का हवाय बुवा ह्यांना घटस्फोट?’ आपल्या संशयी व भांडखोर बायकोबरोबर इतकी वर्षें संसार करताना आपण किती मन:स्ताप सहन केले, आजही करतो आहोत, हे ते स्वत: प्रत्यक्ष अनुभवत असताना तर त्यांना ह्याचं भयंकरच आश्चर्य वाटतं.

संजय संगीतकार बनण्याचं स्वप्न पाहतो आहे. आपलं हे स्वप्न सत्यात उतरण्याची आतुरतेनं वाट पाहत असताना तो ज्या कॅफे शॉपमध्ये रोज जात असतो तिथल्या अटेंडंट मुलीच्या- सरगमच्या विलक्षण कहाणीने तिच्या प्रेमात पडतो आणि चक्क तिच्याशी ‘चट मंगनी, पट ब्याह’ करून मोकळा होतो. सरगम ‘विशेष’ मुलगी असते. तरीही प्रचंड ‘बोलकी’, आयुष्य रसरसून जगू पाहणारी! आयुष्यात खरीखुरी ‘सरगम’ ती कधीच ऐकू शकली नसली तरी मनाच्या कानांनी मात्र तिने ती अनुभवलेली आहे. संजय म्हणूनच तिच्या प्रेमात पडतो. तिच्या ‘विशेष’तेपायी त्यांच्या संसारात कसलीच बाधा येत नाही. ना त्यांना ‘लोक काय म्हणतील’ याची पर्वा असत! ते आपल्याच मस्तीत, धुंदीत परस्परांवर जीवापाड प्रेम करत असतात. यथावकाश त्यांच्या संसारात छोट्या विघ्नेशचं आगमन होतं. त्याने तर त्यांच्या सुखाला भरतंच येतं. तिघांचं छोटुकलं जग परिपूर्ण होतं.

पण…

विघ्नेश जन्मत:च सरगमसारखा ‘विशेष’ असतो. प्रारंभी संजयला याचं काही वाटत नाही. कारण सरगमसोबतच्या सहजीवनात तो तिच्याशी, तिच्या ‘भाषे’शी एवढा एकरूप झालेला असतो की विघ्नेशमधील ही उणीव त्याला  दखलयोग्य वाटत नाही. परंतु जेव्हा विघ्नेशला त्याच्यातील न्यूनापायी अपघात होतो, तेव्हा मात्र त्याला प्रथमच याची जाणीव होते. त्याचा भाऊ डॉ. समीर त्याला विघ्नेशचं हे न्यून कमी करता येऊ शकेल असं सांगतो. विघ्नेशला एका छोट्या ऑपरेशननंतर इतरांइतकं नाही, तरी बऱ्याच अंशी ऐकू येऊ शकेल आणि तो सर्वसामान्यांसारखं नॉर्मल आयुष्य जगू शकेल, असं समीर त्याला समजावतो. प्रारंभी जरी संजयने त्याचं हे म्हणणं हसवून उडवून लावलं असलं तरी विघ्नेशच्या भवितव्याचा गंभीरपणे विचार केल्यावर मात्र त्याला समीरचं म्हणणं पटतं. सरगमला आपल्यासारखा समंजस आणि सांभाळून घेणारा जोडीदार मिळाला, परंतु विघ्नेशचं काय? त्याचं आपल्या पश्चात कसं होणार? या भयंकर विचारासरशी त्याचं पित्याचं मन तिरमिरतं. आपल्या मुलाला इतरांप्रमाणेच नॉर्मल जीवन जगण्याची ही संधी आपण का देऊ नये, असं त्याला वाटतं. तो ही कल्पना सरगमच्या गळी उतरवू पाहतो. परंतु ऑपरेशनच्या भीतीने ती या गोष्टीला बिलकूल राजी होत नाही. संजय तिला समजवायचा खूप प्रयत्न करतो; परंतु व्यर्थ!

मग संजयही हट्टाला पेटतो.

…आणि त्यातून गोष्टी घटस्फोटापर्यंत जातात.

प्रयाग दवे लिखित आणि जय कापडिया संकल्पित व दिग्दर्शित मूळ गुजराती ‘इशारों इशारों में’चं हे संक्षिप्त कथाबीज! आता तुम्ही म्हणाल, या कथेत कसलं आलंय आश्चर्य? सरगमशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होऊन संजयने घटस्फोटाचं पाऊल उचललं असेल तर त्यात त्याचं काय चुकलं?

…तीच तर खरी गंमत आहे! आणि ती प्रत्यक्ष नाटक बघितल्याशिवाय कळणं अशक्य! तेव्हा ‘इशारों इशारों में’ बघणं आलं!! ही एक छान हसती-खेळती प्रेमकहाणी उत्तरार्धात आकस्मिक गंभीर वळण घेते आणि प्रेक्षकांना भावप्रक्षुब्ध करते.

‘इशारों इशारों में’ची रचना सिनेमॅटिक फ्लॅशबॅक पद्धतीनं करण्यात आली आहे. मॅरेज कौन्सेलरला संजय आपला भूतकाळ सांगतो आहे, त्यावेळी घडलेल्या घटना-प्रसंगांचे वर्णन करतो आहे आणि त्यातून कौन्सेलरना (अर्थात प्रेक्षकांनाही!) ही कहाणी उलगडत जाते. या मुख्य कहाणीला खुद्द कौन्सेलरच्याच विस्कटलेल्या संसाराचं विरोधाभासी उपकथानकही जोडलं आहे; ज्यातून विसंगतीद्वारे नाट्यपूर्णता निर्माण होईल! ऑफिसमध्ये बसल्या बसल्या (नाइलाजास्तव) घरची कामं करणारे कौन्सेलर क्षीरसागर हे विरंगुळा निर्माण करणारं आणि नाटकातील ‘नाट्य’ अधिक गहिरं करणारं पात्र योजून लेखक प्रयाग दवे यांनी जुन्या पठडीबाज नाटकांची पुनश्च आठवण करून दिली आहे. यातलं डॉ. समीर हे पात्रही पानपूरक म्हणता येईल असंच. नाटक पाहताना आपल्याला ‘ऑल द बेस्ट’ची अधूनमधून आठवण होत राहते. (अर्थात त्यातील देहभाषा आणि समोरच्याकडून होणारं तिचं अन्वयन- एवढ्यापुरतीच!) इथे चमत्कृती म्हणून देहभाषेचा वापर केलेला नसून, ती नाटकाची गरज आहे. कौन्सेलरचा समांतर ट्रॅक नाटकाला विनोदाचा उपहासगर्भ मसाला पुरवतो. लेखकानं मुख्य कथानक आणि समांतर उपकथानकाची छान फोडणी नाटकाला दिली आहे. कथाबीज बेतीव असलं तरी त्याची मांडणी खिळवून ठेवणारी आहे. अधेमधे कृतक प्रसंगांचे कच्चे दुवे आहेत खरे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करता येतं. उदा. उद्याचा संगीतकार बनण्याचं स्वप्न पाहणारा संजय नंतर ते विसरून चक्क संसारात गुरफटून गेलेला दाखवला आहे. (त्याच्या घरातील फोटोंत होणाऱ्या बदलातूनही हे सूचित केलेलं आहे.) संजय, कौन्सेलर क्षीरसागर आणि सरगम या तीन प्रमुख पात्रांचं व्यक्तिरेखाटन सशक्त झालेलं आहे. त्यामुळेच नाटक प्रेक्षकाला बांधून ठेवतं.

दिग्दर्शक जय कापडिया यांनी संहितेतलं नाट्य अचूक हेरलं आहे आणि प्रयोगात ते केंद्रस्थानी राहील यांची पुरेपूर काळजी घेतली आहे. विशेषत: कौन्सेलरच्या ऑफिसमधील प्रसंग त्यांनी जोरकसपणे बांधले आहेत. अर्थात कौन्सेलर साकारणाऱ्या उमेश जगताप यांनी त्यातली उपहासाची नस बरोब्बर पकडली आहे. त्यामुळे हे प्रसंग चांगलेच उठावदार झाले आहेत. संजयचा भावनिक व मानसिक प्रवास, त्याच्या व्यथावेदना आणि सरगमच्या जन्मत: विशेषतेमुळे अन् त्यातून आलेल्या पूर्वानुभवांमुळे तिची बनलेली मानसिकता यांच्या घर्षणातून निर्माण झालेला संघर्ष नाटकाला एक वेगळे परिमाण प्राप्त करून देतो. या नाटकाचं स्वप्नील जाधव यांनी केलेलं मराठी रूपांतर  वास्तवदर्शी झालेलं आहे.

अजय पुजारे यांनी योजलेले नेपथ्य नाटकाची गरज पुरवतं. कौन्सेलरचं ऑफिस, कॅफे शॉप आणि संजयचं घर अशी लवचीक नेपथ्यरचना त्यांनी केली आहे. अजय-आर्यन यांनी प्रकाशयोजनेतून यातलं नाट्य अधिक खुलवलं आहे. राहुल रानडे यांनी संगीतातून नाटकात अपेक्षित सरगम आणली आहे. गुरू ठाकूर यांच्या रचनेला गायक अवधूत गुप्ते आणि शाल्मली सुखटणकर यांनी सुश्राव्यता दिली आहे. ईशा कापडिया (वेशभूषा) आणि राजेश परब (रंगभूषा) यांनीही आपली कामं चोख केली आहेत.

सागर कारंडे यांनी बऱ्याच कालावधीनंतर आपल्यातील संवेदनशील अभिनेत्याला आव्हान देणारी भूमिका यात साकारली आहे. संजयचा व्यक्ती म्हणून होणारा प्रवास; तसंच त्यांनी या भूमिकेच्या सूक्ष्म कंगोऱ्यांचा सखोल विचार केल्याचं जाणवतं. संजयच्या बदलत गेलेल्या भावावस्था त्यांनी उत्कटतेनं व्यक्त केल्या आहेत. संजय आणि सरगम यांच्यामधील ट्युनिंग, तसंच कौन्सेलरबरोबरची वर्तन-जुगलबंदी हे नाटकातील उच्चतम प्रसंग होत. सरगम झालेल्या संजना हिंदपूर यांचं व्यावसायिक रंगभूमीवरचं हे पहिलंच नाटक आहे असं जराही वाटत नाही, इतक्या सफाईने त्या वावरल्या आहेत. पहिलीच भूमिका- तीही संवादरहित स्वीकारून त्यांनी आपल्यातील अभिनयक्षमतेसंबंधात आत्मविश्वास प्रकट केला आहे. त्यांचा विलक्षण बोलका चेहरा आणि शारीर बोलीची यथार्थता त्यांना सरगमची भावनिक आंदोलनं बोलके करण्यास उपयोगी ठरली आहे. कौन्सेलर क्षीरसागर संस्मरणीय करण्यात उमेश जगताप यांनी आपला प्रदीर्घ अनुभव पणाला लावला आहे. त्यांच्या प्रतिक्षिप्त क्रिया इतक्या सहजोत्स्फूर्त आहेत, की ज्याचं नाव ते! विसंगतीपूर्ण आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या वेदना त्यांनी मूर्त केल्या आहेत. शशिकांत गंगावणे (डॉ. समीर) आणि प्रीत भारडिया (विघ्नेश) यांनी त्यांच्या भूमिका यथास्थित केल्या आहेत. एक छान करमणूक आणि आगळा अनुभव देणारं हे नाटक एकदा  पाहायलाच हवं.

Story img Loader