बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला अत्तापर्यंत आपण अनेक चित्रपटातून ठकसेनाची अथवा चोराची भूमिका साकारताना पाहिले आहे. असे असले तरी, प्रत्यक्ष आयुष्यात आपण एक सामान्य व्यक्ती असून, आपण कोणालाही फसवत नसल्याचा, अथवा खोटं बोलत नासल्याचा खुलासा त्याने केला आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला, मी खोटं बोलत नाही, अथवा लोकांना फसवत नाही. मी एक सामान्य माणूस आहे. माझ्या कामा प्रती मी प्रामाणीक असून, त्यातून मला उत्तेजना मिळते. नकारात्मकता, तडजोड आणि राजकारण या गोष्टी मला पसंत नसल्याने, मी स्वत:ला या सर्वांपासून दूरच ठेवतो. देवाच्या कृपेने मला ज्या कामाची आवड आहे, त्याच क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. जिवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहाणे गरजेचे असल्याचे मतदेखील त्याने व्यक्त केले. तो पुढे म्हणाला, जेव्हा मी एखाद्याशी वाईट वागतो किंवा एखाद्याला दुखावतो, त्या गोष्टीचा सर्वात जास्त त्रास मलाच होतो. ती गोष्ट मला आतून खात राहाते. कोणाशीही गैरवर्तन न करण्याची उपरती मला झाल्याने, प्रामाणिक आणि स्वच्छ जिवन जगण्याला मी प्राधान्य दिले. नुकताच रणवीरचा ‘किल दिल’ चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्यात गोविंदा, अली जफर आणि परिणिती चोप्रा यांच्यादेखील भूमिका आहेत. सध्या तो संजय लीला भन्साळींच्या ‘बाजिराव मस्तानी’ चित्रपटात व्यस्त असून, त्यात तो बाजिराव पेशव्यांची भूमिका साकारत आहे. बाजिरावांची आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी त्याने डोक्यावरील केस काढण्याबरोबरच मराठीचे धडेदेखील गिरवायला सुरुवात केली आहे.

Story img Loader