रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या प्रेमाची चर्चा चित्रपटसृष्टीमध्ये दीर्घकाळ चवीचवीने चघळली जात होती. परंतु या दोघांनी आपल्या प्रेमाची कधीच जाहीरपणे कबुली दिली नाही. आता तर एका कार्यक्रमात रणबीरने ‘मी एकटाच बरा..’ असे सांगत सर्वानाच बुचकळ्यात टाकले आहे.
गेल्या काही वर्षांत माझी एकटे राहण्याची सवय वाढत गेली आहे. मी एकटाच जगभर फिरतो, किंबहुना फिरतानाच नाही तर एरव्हीही मला एकटे रहायला, एकटे जेवायला आवडते. मला सोबत कोणी असावे असे वाटत नाही. मी जेव्हा एकटा असतो तेव्हा सगळ्यात आनंदी असतो, असे भरभरून एकटेपणावर बोलणाऱ्या रणबीरला पाहून उपस्थितांनाही याला एकटेच सोडलेले बरे, असे वाटून गेले.
‘मेक माय ट्रीप’ या ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टलने ‘यह जवानी हैं दिवानी’ या चित्रपटाचे अधिकृत ट्रॅव्हल पार्टनर असल्याची घोषणा केली. अयान मुखर्जी दिग्दर्शित रणबीर आणि दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली पहिली ट्रीप, आतापर्यंतचा प्रवास यावर रणबीरने मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘दहावीची परीक्षा झाल्यावर मित्रांबरोबर मी गोव्याला गेलो होतो. मित्रांसोबत केलेली धम्माल आजही मनाच्या कोपऱ्यात ताजी आहे. त्यामुळे गोव्याची सहल माझ्या कायम स्मरणात राहिली आहे’, अशी आपल्या पहिल्या-वहिल्या सहलीची आठवणही रणबीरने सांगितली. प्रेमासाठी ठराविक अशी जागा नसते. तुमच्या आवडत्या माणसाबरोबर तुम्ही असलात तर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला प्रेम करता येऊ शकते .
आधी दीपिका, मग नर्गिस फाकरी आणि आता कतरिना कैफ अशा तिघींबरोबर प्रेमप्रकरण रंगवूनही आपण एकटे असल्याची बोंब रणबीरने ठोकली आहे. त्याचे पडसाद रणबीरच्या प्रेमात बुडालेल्या कतरिनावर काय उमटतात हे लवकरच कळेल..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा