दिल्लीत घडलेल्या ‘निर्भया’ प्रकरणानंतर कोयदे अधिक कडक झाले. अपराध्यांना शिक्षाही ठोठावली गेली तरी अजूनही बलात्काराच्या घटना थांबलेल्या नाहीत. उलट, अशा घटनांच्या वाढत्या आकडय़ांनी एकूणच स्त्रियांच्या मनातली सुरक्षिततेची भावनाच संपवून टाकली आहे. एक अभिनेत्री असून, तथाकथित सुरक्षित वातावरणात असूनही सद्यस्थितीत आपल्यालाही इतर स्त्रियांप्रमाणेच असुरक्षित वाटते, अशी भावना अभिनेत्री साक्षी तन्वर हिने व्यक्त केली आहे. ‘निर्भया’ प्रकरणानंतर दीड वर्ष उलटूनही स्त्रियांच्या सुरक्षिततेवर आणि या देशातील कायद्यांवर उमटलेले प्रश्नचिन्ह तसेच आहे. यानिमित्ताने सत्य घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या सोनी टीव्हीवरच्या ‘क्राइम पेट्रोल’ या शोमध्ये एक विशेष भाग चित्रित करण्यात आला आहे. या भागात एकूणच ‘निर्भया’ची कथा आणि त्यानंतरच्या घटनांनी देशभरात उठलेल्या वादंगाचा धुरळा या सगळ्याचा वेध एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका स्त्रीच्या मनातली ही कथा-व्यथा साक्षी तन्वर या भागात मांडणार आहे. ‘क्राइम पेट्रोल’ या शोच्या प्रारंभापासूनच साक्षी या शोबरोबर सूत्रसंचालक म्हणून जोडली गेली होती. त्यानंतर काही मोजके भाग वगळता तिने या शोमध्ये सहभाग घेतला नव्हता. पण दिल्लीतील सामूहिक बलात्काराची कथा नव्या विचाराने, दृष्टिकोनातून मांडणाऱ्या या भागाच्या निमित्ताने पुन्हा ‘क्राइम पेट्रोल’शी जोडले जावे ही खरोखरच अनमोल संधी आहे, असे मत साक्षीने व्यक्त केले.
एक स्त्री म्हणून असुरक्षिततेच्या या भावनेने मलाही ग्रासले आहे. पीडित मुलींचे दु:ख, त्यांचा राग या गोष्टी मी समजून घेऊ शकते आणि त्यांची तीच भावना या भागातून मांडणार असल्याचे साक्षी तन्वरने सांगितले.
या भागाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दल गांभीर्याने आणि सर्वागाने विचार व्हायला हवा, असे तिने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा