‘गोलियों की रासलीला- रामलीला’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘यह जवानी है दिवानी’, ‘हॅप्पी न्यू इअर’ आणि आता ‘पिकू’.. दीपिकाच्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीवर नजर टाकली तरी त्यातला प्रत्येक चित्रपट हा दुसऱ्या चित्रपटापेक्षा वेगळा आहे. ती त्याच त्याच चौकटीतील भूमिका करते आहे, असं म्हणण्यास कोणीही धजावणार नाही इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका तिने केल्या आहेत. त्यात शूजित सिरकारच्या ‘पिकू’ सारख्या अगदी नितांतसुंदर चित्रपटाच्या यशाने भर टाकली आहे. या यशामागे तिची निवड आहे का?, असं विचारल्यावर भूमिकांच्या बाबतीत मी खरोखरच इतरांपेक्षा नशीबवान आहे, असं दीपिकाने सांगितलं. rv03शूजित सिरकारचा ‘पिकू’ हा अत्यंत सरळ-साधा आणि तरल कथा सांगणारा चित्रपट होता. त्याने पहिल्या दिवशी माझ्या हातात पटकथा ठेवली ती वाचल्यावरच मी त्याला होकार दिला होता. वडील आणि मुलगी यांच्या नात्याची एक सुंदर कथा माझ्या हातात होती. शूजितसारखा दिग्दर्शक माझ्यासमोर होता. त्यामुळे या कथेचं सोनं होणार याची मला खात्री होती. मात्र, कुठलाही माल-मसाला नसलेला असा हा साधासरळ चित्रपट इतका यशस्वी होईल. अवघ्या काही दिवसांत २५ कोटींपेक्षा जास्त उलाढाल करणारा चित्रपट ठरेल, लोकांचा एवढा अफाट प्रतिसाद या चित्रपटाला मिळेल अशी अपेक्षा मात्र मी केली नव्हती, असं दीपिका म्हणते. मुळात, हेच चित्रपटाचं कौतुक आहे. ‘पिकू’ लोकांना आवडला कारण, तो त्यांच्या रोजच्या जगण्याशी निगडित आहे. पिकू ही आजच्या तरुणीचं प्रतिनिधित्व करते. ती एकाच वेळी अनेक कामांचं व्यवस्थापन करण्यात माहीर आहे. नोकरी, वडील, स्वत:चे छंद अशा सगळ्याच आघाडय़ा ती आजच्या तरुणींप्रमाणे सांभाळते आहे. मला वाटतं कित्येकांनी ती आपल्यातली एक वाटली असेल, यात शंका नाही. पण, चित्रपट फक्त पिकूपुरता मर्यादित नाही. ती, तिचे वडील, त्यांचं नातं, त्यांचं रोजचं जगणं, त्यांच्या आयुष्यात आलेल्या इतरांबरोबरचे त्यांचे संबंध असे अनेक पैलू या चित्रपटात होते. ती लोकांच्या मनातलीच कथा होती आणि दिग्दर्शक म्हणून शूजितने ती इतक्या साध्या पण, प्रभावी पद्धतीने मांडली आहे की ती आपल्या काळजाचा ठाव घेते. ‘पिकू’सारखे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांच्या पसंतीस उतरणारे चित्रपट फार कमी वाटय़ाला येतात, असं दीपिका म्हणते. बॉलीवूडची आजची आघाडीची अभिनेत्री म्हटल्यावर ती तद्दन व्यावसायिक चित्रपटांनाच महत्त्व देणार किंवा तिने तसे केले पाहिजे, असा एक आग्रह जनमानसात असतो. तसा तो रूढार्थाने तिने कधीच पाळला नाही. मात्र, यामागे एक विचार होता असं काही ती म्हणत नाही. यशाचा असा कोणताच फॉम्र्युला नसतो. पटकथा वाचल्यानंतर ती आवडली आणि खरोखरच काहीतरी चांगलं निर्माण होईल, असं मनाशी वाटलं तर मी ती स्वीकारते. माझ्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे चित्रपटाचा दिग्दर्शक. दिग्दर्शकाच्या कामाबद्दल खात्री असेल तर कथा कशीही असो तो त्याला न्याय देणारच हा एक विश्वास असतो. या दोन्हींचा विचार करून मी चित्रपट निवडते. मात्र, माझ्याकडे येणारे चित्रपट आणि भूमिका यांच्याबाबतीत मी खरोखरच नशीबवान आहे, असं ती सांगते. सध्या आपली वेळ खूप चांगली आहे असं तिला वाटतं. माझ्याकडे ज्या पटकथा येत आहेत त्या पाहता माझ्या आयुष्यातली ही सर्वात सुंदर आणि चांगली वेळ आहे असं ती म्हणते. संजय लीला भन्साळी किंवा शूजितसारख्या दिग्दर्शकांना तिला घेऊन वेगळे प्रयोग करावेसे वाटतात ही तिच्या दृष्टीने खरोखरच चांगली बाब आहे. त्यामुळेच आपल्या वाटय़ाला हे यश आलं असल्याचं दीपिकाला वाटतं. इरफानसारख्या वेगळ्या कलाकाराची नायिका म्हणून काम करताना रिस्क वाटली नाही का?, यावरही असा विचारच आपण कधी केला नसल्याचं ती म्हणते. सध्या ज्या प्रकारचे दिग्दर्शक आणि चित्रपट येत आहेत ते पाहता वेगळे कलाकार, वेगळी कथा याच गोष्टी अपेक्षित असल्याचं तिने ठामपणे सांगितलं. ‘पिकू’च्या यशात आणि कौतुकात न्हाऊन निघाली असली तरी त्यावर विचार करायला उसंत नसल्याचं ती सांगते. सध्या तिच्यासमोर दोन महत्त्वाचे चित्रपट आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ आणि रणबीरबरोबरचा इम्तियाज अली दिग्दर्शित ‘तमाशा’. हे दोन्ही चित्रपट आपल्यासाठी फार महत्त्वाचे असल्याचे दीपिकाने सांगितले.
-रेश्मा राईकवार

Story img Loader