जेष्ठ अभिनेते अनुपम खेर राजकारणात येणार अशा वावड्या उठत असतांनाच, अनुपम खेर यांनी स्पष्ट शब्दात याचा नकार केला आहे. आपण चित्रपटसृष्टीतील कामात खुश असून अरविंद केजरीवाल प्रमुख असलेल्या ‘आम आदमी’ पक्षातून निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले.  आपण काम करत असलेल्या चित्रपटाचे काय होणार, या काळजीपोटी चित्रपटाच्या निर्मात्याने आपल्या राजकीय प्रवेशाबाबत विचारणा केली असता, आपण असे काहीही करणार नसल्याचे सांगून त्याची शंका दूर केल्याचे ते म्हणाले. याबाबत टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, जो कोणी ही अफवा पसरवत आहे त्याने त्वरीत हे थांबवावे. मी चित्रपटसृष्टीत आनंदी आहे. नागरीक म्हणून समस्यांबाबत आवाज उठवणे हे महत्वाचे असून, आपण ते राजकारणात प्रवेश न करता देखील करू शकत असल्याचे ते म्हणाले. याबाबतच्या टि्वटरवरील संदेशात ते म्हणतात, एक जबाबदार नागरिक म्हणून सामाजातील ज्या घटनांनी आपण व्यथित होतो त्याबाबत आवाज उठवणे महत्वाचे आहे. परंतु, त्यासाठी मला राजकीय व्यसपीठाची गरज नाही.