चित्रपटाच्या पडद्यावर बिनधास्त भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा खासगी जीवनात मात्र लाजाळू असल्याचे तिने म्हटले आहे. एका कार्यक्रमादरम्यान, स्टार या उपाधीबरोबर येणाऱ्या कोणत्या गोष्टी तुला आवडत नाहीत, असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना  सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागते, ही बाब खटकत असल्याचे प्रियांकाने सांगितले. आमच्या जीवनात खूप ऐषोआराम आहे, आमच्याकडे भल्यामोठ्या गाड्या आहेत, असे लोकांना कायम वाटत असते. मात्र, यासाठी आम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागते. स्टार असल्यावर तुमचे आयुष्य फक्त तुमच्यापुरते मर्यादित नसते. खासगी जीवनात एक व्यक्ती म्हणून मी लाजाळू आहे आणि स्वत:विषयीच्या गोष्टी मी खासगी ठेवणेच पसंत करते. मला स्वत:साठी वेळ हवा असतो. परंतु, एखाद्या स्टारसाठी या गोष्टी अवघड असल्याचे तिने म्हटले.
यावेळी प्रियांकाने बॉलिवूडमधील तिच्या संघर्षाच्या काळातील अनेक आठवणी जाग्या केल्या. बॉलिवूडने मला स्वीकारले, परंतु मला त्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. मात्र, या संपूर्ण प्रवासात काही अनोख्या लोकांनी माझ्यातील गुणवत्ता हेरून मला संधी दिल्याचे प्रियांकाने सांगितले. २००३साली ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ ए स्पाय’ या चित्रपटातून प्रियांकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर नुकत्याच येऊन गेलेल्या ‘मेरी कोम’ चित्रपटापर्यंतचा प्रियांकाचा प्रवास कौतुकास पात्र आहे. आगामी काही दिवसांतच दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या ‘मॅडमजी’ या चित्रपटातून प्रियांका चोप्रा नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

Story img Loader