चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि सहज अभिनय यामुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान ही कायमच चर्चेत असते. मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हे नाव महाराष्ट्रात घराघरात पोहोचलं ते ‘होणार सून मी या घरची’ मालिकेमुळे. आजही ही मालिका प्रेक्षक विसरलेले नाहीत. त्यानंतर तेजश्री प्रधान हिने ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती. तेजश्री प्रधान ही लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणून ‘अग्गंबाई सासूबाई.’ या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील शुभ्राने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील शुभ्रा ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली होती. तेजश्री प्रधान ही सोशल मीडियावर फारच सक्रीय असते. नुकतंच ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तेजश्रीने मालिकेत कमबॅक करण्याबद्दल भाष्य केले आहे. “मी मराठी मालिकेत म्हणजेच छोट्या पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्यासाठी योग्य स्क्रिप्ट आणि भूमिकेची वाट पाहत आहे”, असे तिने म्हटले.
“माझ्या कोणत्याही निर्णयावर मी खंत…”, तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“मी टीव्हीवर परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मला कल्पना आहे की प्रेक्षक वर्ग आणि माझे चाहतेदेखील टीव्हीवर पुन्हा परतण्याची वाट पाहत आहेत. पण मला सध्या सर्वोत्कृष्ट गोष्टींची अपेक्षा आहे. मला आता छोट्या पडद्यावर ऑनस्क्रीन मजबूत, सकारात्मक आणि प्रेरणादायी भूमिका साकारायला नक्कीच आवडेल”, असेही ती म्हणाली.
“मी आतापर्यंत कोणतीही भूमिका निवडताना ठराविक मर्यादा निश्चित केलेली नाही, पण मला एखादी मजबूत, प्रेरणादायी किंवा समाजात बदल घडवून आणणारी एखादी भूमिका साकरायला नक्कीच आवडेल. अशी भूमिका मला लवकरच मिळेल. त्यामुळे आता मी फक्त एका विशिष्ट पात्राद्वारे छोट्या पडद्यावर परतण्याची वाट पाहत आहे.” असे तिने म्हटले.
“विशेष म्हणजे मलाही प्रेक्षकांना भेटण्याची आतुरता आहे. मी त्यांना आणखी वाट पाहण्यासाठी नक्कीच भाग पाडणार नाही. मी लवकरच चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का देणार आहे”, असे तेजश्री म्हणाली.