‘पीके’ चित्रपटामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्याबद्दल माफी मागतो, असे अभिनेता आमीर खानने म्हटले आहे. या चित्रपटाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाल्यापासून आमीरने या संपूर्ण प्रकरणावर चुप्पी साधली होती. पहिल्यांदाच त्याने आपले मौन सोडत भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली.
आमीरची प्रमुख भूमिका असलेला ‘पीके’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर चालला होता. या चित्रपटात धार्मिक गुरूंवर टीका करण्यात आली होती. त्याचबरोबर या चित्रपटाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर आमीर म्हणाला, हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. जर चित्रपटामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी माफी मागतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता. आम्हाला जे सांगायचे होते, तो महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे आम्ही ते स्पष्टपणे सांगितले. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो.
गेल्यावर्षी १९ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता. चित्रपटाच्या यशाबद्दल तो म्हणाला, चित्रपट इतका व्यवसाय करेल, असे कधी वाटले नव्हते. जेव्हा आम्ही एखाद्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतो. त्यामध्ये मन लावून काम करतो आणि तो चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरतो, ते पाहून खूप आनंद होतो आणि समाधान वाटते, असे त्याने सांगितले.

Story img Loader