अभिनेता विवेक ओबेरॉय हा पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट म्हणजे एक विशिष्ट विचारधारा पुढे करणारा चित्रपट नव्हे असं विवेक म्हणाला. इतकंच नाही तर माझा मोदींवर विश्वास आहे पण मी भाजपचा सदस्य नाही असंही त्यानं स्पष्ट केलं आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विवेकनं एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. या आठवड्यात प्रदर्शित होणारा हा चित्रपट अनेक कारणानं वादात सापडला आहे. या चित्रपटाचा वापर भाजप पक्षाच्या प्रचारासाठी केला जाणार असल्याचा आरोप अनेक विरोधी पक्षांचा आहे. हे आरोप विवेकनं खोडून काढले आहेत. ‘हा चित्रपट कोणतीही विचारधारा मांडणारा चित्रपट नाही. खोट्या आरोपांचा सामना पंतप्रधान मोदी गेल्या पाच वर्षांपासून करत आहेत तोच सामना आता मला करावा लागत आहे. निवडणूक आयोग, न्यायालय यापैकी कोणीही चित्रपटावर आक्षेप घेतला नाही. मग इतरांनी आक्षेप नोंदवण्याचं कारण काय असा सवाल त्यानं केला आहे. ‘मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी भाजपचाही सदस्य नाही मात्र माझा मोदींवर विश्वास आहे’ असं विवेकनं स्पष्ट केलं आहे.

या कार्यक्रमात भारतीय लष्कर हे ‘मोदी यांची सेना’ आहे असं म्हणणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचीही विवेकनं बाजू घेतली आहे. ‘सेना ही प्रत्येकाची आहे ती मोदींची सेना आहे तशीच ती माझीही सेना आहे.’ असंही विवेक म्हणाला.

Story img Loader