अभिनेत्री बिपाशा बासू आणि ‘अलोन’ चित्रपटातील तिचा सहकलाकार करण सिंग ग्रोव्हर येत्या ३० तारखेला विवाहबद्ध होणार आहेत. यानिमित्ताने सध्या बिपाशा आणि करणच्या नात्याचे विविध पैलू चर्चिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर करणने विवाहसंस्थेविषयी केलेले विधान अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. माझा संसार दोनवेळा मोडला असला तरी अजूनही माझा विवाहसंस्थेवरील विश्वास कायम असल्याचे करणने ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. दोनदा अपयश येऊनही तुझा विवाहसंस्थेवरील विश्वास अजूनही उडाला कसा नाही, असा प्रश्न यावेळी करणला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना करण म्हणाला की, दोष हा विवाहसंस्थेत नसून तो लग्न करणाऱ्या लोकांमध्ये आहे. काहीवेळा तुमची निवड चुकते. तुमचा विवाह योग्य व्यक्तीशी होत नाही किंवा काहीवेळा गोष्टी हव्या तशा घडत नाहीत, अथवा तुम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र म्हणूनच ठीक असता. त्यामुळे मैत्रीची मर्यादा न ओलांडता नाते पुढच्या टप्प्यावर नेणे टाळले पाहिजे, असे करणने सांगितले होते. दरम्यान, त्यावेळी बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या प्रेमाची अधिकृत कबुली दिली नव्हती. त्यामुळे बिपाशाविषयी तो सावधपणे बोलत होता. बिपाशा आणि मी एकमेकांच्या खूप जवळ आहोत. बिपाशा ही खूप प्रेमळ व्यक्ती असल्याचे त्यावेळी करणने म्हटले होते.
‘अलोन’ या भूषण पटेल दिग्दर्शित चित्रपटाच्या निमित्ताने बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर पहिल्यांदाच एकत्र आले. या चित्रपटाच्या सेटवरच त्यांची प्रेमकथेची सुरुवात झाली आणि चित्रपट संपेपर्यंत ती सुफळही झाली. लग्न हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे सगळ्यांना जाहीरपणे सांगून, आईची-घरच्यांची संमती घेऊनच लग्न करणार असल्याचे तिने म्हटले होते. एकेकाळी छोटय़ा पडद्यावर ‘दिल मिल गये’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेल्या करण सिंग ग्रोव्हरचा हा तिसरा विवाह असणार आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगमशी विवाह केला होता. लग्नानंतर दहा महिन्यांतच श्रद्धापासून घटस्फोट घेणाऱ्या करणने ‘दिल मिल गये’ या मालिकेतील त्याची सहकलाकार जेनिफर विंजेटशी विवाह केला होता. मात्र २०१४ मध्ये जेनिफर आणि करण विभक्त झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा