दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ गाण्याने जगभरात आपली छाप सोडत मानाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला. ‘नाटू नाटू’ने ओरिजनल गाण्याचा गोल्ड ग्लोब अवॉर्ड जिंकला. त्यानंतर चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हे गाणंही ट्रेंड होतंय. अशातच हा अवॉर्ड जिंकल्यानंतर गाण्याचे नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “मी पूर्णपणे ब्लँक झालो होतो, मी माझ्या वॉशरूममध्ये दीड तासांपेक्षा जास्त वेळ रडत होतो. एवढा मोठा अवॉर्ड आमच्या गाण्याला मिळाला, यावर मला विश्वासच बसत नव्हता. पण, राजामौली सरांच्या मेहनतीमुळे ते घडलं. मी खूप आनंदी आहे. हे सर्व ज्युनियर एनटीआर आणि चरण सर या दोन हिरोंमुळे घडलं, कारण ते खूप चांगले डान्सर आहेत, असं प्रेम रक्षित म्हणाले.”
Video: किसिंग व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकत्र दिसले तमन्ना-विजय; नेटकरी म्हणतात, “बकवास…”
प्रेम रक्षित म्हणाले, “नाटू नाटू गाण्याचे शूट पूर्ण करण्यासाठी अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांना जवळपास २० दिवस लागले होते. पण, दोघांनीही त्यांचे १०० टक्के देत गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं होतं.” दरम्यान, या गाण्यातील एकून एक स्टेपसाठी त्यांनी मेहनत घेतली होती. या गाण्याच्या तयारीला त्यांना दोन महिने लागले होते.
हॉलिवुड दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी तब्बल दोन वेळा पाहिला ‘RRR’; राजामौली ट्वीट करत म्हणाले…
“राम चरण व ज्युनिअर एनटीआर यांना गाणं शूट करताना ब्रेक नको होता. ते दोघेही खूप समर्पित कलाकार आहेत. मी त्यांना जे काही सांगितलं ते त्यांनी केलं. पॅकअप झाल्यावर राजामौली सर आमच्याबरोबर रिहर्सल करायचे. आम्ही सर्वजण सकाळी ६ वाजता उठायचो आणि रात्री १० वाजता झोपायचो. सर्वांनी या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली होती,” असं प्रेम रक्षित यांनी सांगितलं.
‘नाटू नाटू’ गाणं एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केलं असून काल भैरव आणि राहुल सिपलिगुंग यांनी गायलं आहे.