अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर हा चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या २४ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, ओमकार गोवर्धन, संदीप पाठक, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, नंदू माधव हे कलाकार चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित असून अभिनेत्री प्राजक्ता माळी ही या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. नुकतंच प्राजक्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी ही चांगलीच चर्चेत आहे. रानबाजार या वेबसीरिजमधील तिच्या भूमिकेसाठी तिला ट्रोल केले जात आहे. तर दुसरीकडे अनेक चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचे हे चित्रपट चांगलेच हिट ठरताना दिसत आहे. नुकतंच ‘वाय’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ताने प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. ‘वाय’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान प्राजक्ताचा ब्रेकअप झाला होता, असे तिने या मुलाखतीत सांगितले.
“राज ठाकरे चटकन कोणाला जवळ करत नाहीत आणि केलं तर…”, भरत जाधव यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“‘वाय’ या चित्रपटात माझी भूमिका अंत्यत छोटी आहे. पण ती तितकीच महत्त्वपूर्णही आहे. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप गोष्टी होत होत्या. त्यावेळी माझं ब्रेकअप झालं होतं. मी कुठे आहे, माझं काय सुरु आहे, याची मला काहीही कल्पना नव्हती. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानच्या अनेक गोष्टी मला नीट आठवतही नाहीत”, असेही प्राजक्ता म्हणाली.
“आम्ही जेव्हा हा चित्रपट पाहात होतो, तेव्हा मला चित्रपटाचे दिग्दर्शक आठवण करुन देत होते की तू हा सीन करताना पडली होती. तू हा सीन करताना हे असं असं बोलली होतीस, तुला आठवतंय का? त्यांनी मला हे प्रश्न विचारल्यावर मी फक्त हो असे म्हणत होती. पण मला त्यावेळी या गोष्टी अजिबात आठवत नव्हत्या. त्यावेळी मी माझ्याच विचारात गुंतलेली होते”, असे प्राजक्ताने सांगितले.
कुशल बद्रिकेच्या परफॉर्मन्सला अनिल कपूर- कियारानंही दिली दाद, व्हिडीओ एकदा पाहाच
त्यापुढे प्राजक्ता म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात या सर्व घडामोडी घडल्यानंतर जेव्हा ‘वाय’ चित्रपट पाहिला तेव्हा फारच खूश होते. मी हा चित्रपट निवडून योग्य निर्णय घेतला होता याची मला खात्री झाली. चित्रपटाचा विषय खूपच छान आहे आणि हा चित्रपट पाहून झाल्यावर तुम्हाला तो नक्कीच विचार करायला भाग पाडायला लावणारा आहे. चित्रपटातून इतक्या घडामोडी घडतात याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. आपल्या महाराष्ट्रात आपल्या जवळच इतक्या सगळ्या गोष्टी घडतात, हे तुम्हाला हा चित्रपट पाहिल्यावर कळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक मोठा धक्का असणार आहे. मी या चित्रपटाचा एक भाग आहे आणि याचा मला आनंद आहे.”
कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.