अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाल्याच्या बातमीनंतर सगळी हिंदी सिनेसृष्टी शोकसागरात बुडालेली असतानाच दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी एक भलेमोठे पत्र लिहित, ‘मी श्रीदेवी आणि देवाचा प्रचंड तिरस्कार करतो’ असे म्हटले आहे. या पत्रातून त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच एकापाठोपाठ एक ट्विट करत रामगोपाल वर्मा यांनी त्या ट्विटची एक फेसबुक पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूसाठी देवाला जबाबदार धरून दोष दिला आहे.

श्रीदेवीच्या मृत्यूला देव जबाबदार आहे त्यामुळे मी देवाचा तिरस्कार करतो आणि श्रीदेवी यांचाही मी तिरस्कार करतो कारण त्या हे जग सोडून गेल्या. एवढेच नाही तर अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबतच्या आठवणीही पोस्ट केल्या आहेत.’शरणम’ आणि त्यानंतरच्या एका सिनेमाबाबत श्रीदेवीसोबत काम करतानाच्या आठवणी त्यांनी मांडल्या आहेत. तसेच श्रीदेवीसोबतचे अनेक फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.

रामगोपाल वर्मा यांच्या फेसबुक पोस्टमधले मुद्दे काय आहेत?

श्रीदेवीचा मृत्यू.. मला वाटते आहे की हे एक वाईट स्वप्न आहे. पण नाही हे सत्य आहे.

आय हेट श्रीदेवी.

श्रीदेवीला मी दैवत मानत होतो, पण त्यांना मृत्यू आला त्यामुळे त्या माणूसच आहेत हे त्यांनी दाखवून दिले, म्हणून मी त्यांचा तिरस्कार करतो.

त्यांच्याकडेही एक हृदय होते जे जिवंत राहण्यासाठी धडधडत होते म्हणून मी त्यांचा तिरस्कार करतो.

त्यांच्या इतके विशाल मन कोणाही अभिनेत्रीचे नव्हते म्हणून मी त्यांचा तिरस्कार करतो.

श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी मी ऐकली आणि त्यांचे पार्थिव पाहण्यासाठी मी जिवंत आहे म्हणून मी त्यांचा तिरस्कार करतो.

मला देवाचाही तिरस्कार वाटतो आहे कारण देवाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.

श्रीदेवी या आपल्याला सोडून गेल्या त्यामुळे मी त्यांचाही तिरस्कार करतो.

तुम्ही जिथे कुठे असाल श्रीदेवी मी तुमच्यावर कायम प्रेम करतो आणि यापुढेही करत राहिन.

-रामगोपाल वर्मा

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी श्रीदेवी यांच्याबाबत ही पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट ट्विटर आणि फेसबुकवरही शेअर करण्यात आली आहे.

Story img Loader