चांगल्या भूमिका माझ्याकडे येत गेल्या तरी मिळालेली भूमिका आपण कशी साकारतो, हे ही महत्वाचे आहे. मला मिळालेल्या भूमिका मी निवडल्या असल्या तरी एखाद्या भूमिकेला नाही म्हणणे व एखाद्या भूमिकेसाठी वाट पाहण्याची तयारी ठेवली पाहिजे, ती मी दाखविली आणि चित्रपटातून केलेल्या विविध भूमिकांमुळे मी घडत गेले, असे प्रतिपादन अभिनेत्री आणि ‘लोकसत्ता’-व्हिवा’ पुरवणीच्या अतिथी संपादक सोनाली कुलकर्णी यांनी बुधवारी दादर येथे केले.
चतुरंग प्रतिष्ठानने दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’ या उपक्रमाअंतर्गत रसिकांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. या वेळी त्या बोलत होत्या.
माझे बालपण, शालेय-महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात गेले. पुण्यातील मी राहात असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील गणेशोत्सवातील विविध कार्यक्रमातून मी सहभागी व्हायचे. माझा मोठा भाऊ संदीप याने लिहिलेल्या नाटकांमधूनही मी काम केले. पं. सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेने मला नेमकी दिशा दिली. अभिनय करण्यात एक धाडस आहे. नाटक/चित्रपटात अभिनय करणे हे मला आव्हान वाटले आणि मी हाच व्यवसाय करण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पं. दुबे यांच्या रुपाने मला एक चांगला शिक्षक व मार्गदर्शक मिळाल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, दुबे यांनी मला फक्त अभिनेत्री म्हणून घडविले नाही तर माझा सर्वागिण विकास करवून घेतला. चित्रपटाच्या ऑडिशनच्या वेळी मला एका महिलेकडून माझ्या सावळेपणाबदद्दल हिणवून मी येथे कशाला आले, असा टोमणा मारला गेला होता. त्या क्षणी मला खूपच वाईट वाटले. पण पं. दुबे यांनी माझ्या मनातील न्यूनगंड काढून टाकून टाकला, असे सांगून त्या म्हणाल्या की, मुंबई शहराने माझ्यातील व्यावसायिक दृष्टीकोन घडविला. मला खूप काही शिकविले, माझे व्यक्तिमत्व घडविले.
लेखनाकडे कसे वळलो, याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, महाविद्यालयीन नाटय़ स्पर्धेच्या वेळी मी दोन संहिता सादर केल्या होत्या. लहानपणापासून लिहिण्याची आवड होतीच. लिहिणे म्हणजे नुसते कागदावर खरडणे नव्हे तर त्यातून काहीतरी विचार दिला गेला पाहिजे, असे मला वाटते. पुढे ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा’ पुरवणीसाठी लिहिण्याची संधी मिळाली. त्यातील ‘सोकूल’च्या लेखांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. हे लेखन सर्व वयोगटातील अनेकांच्या पसंतीस उतरले असून माझे कोणतेही लेख हे कल्पनारंजन नसते. तर आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेली माणसे, आलेले विविध अनुभव, घडलेल्या घटना या मी लेखनातून मांडत असते.
दीड ते पावणेदोन तास रंगलेल्या या गप्पांमध्ये सोनाली कुलकर्णी यांनी इटालियन चित्रपटात केलेली भूमिका, चित्रिकरणादरम्यानचे किस्से, ‘झलक दिखला जा’, खतरोंके खिलाडी’, बालपण, आई-वडिलांचे संस्कार या विषयीही भरभरून सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा