दुर्धर आजाराने ग्रासल्यापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. आता मी कोणत्याही गोष्टी ठरवून करत नाही किंवा माझे काहीच प्लॅन्स नाहीत. मृत्यू मला कोणत्याही क्षणी कवटाळू शकतो असं अभिनेता इरफान खान म्हणतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या उपचाराविषयीचे काही अपडेट्स दिले आहेत.

‘किमोचे सहापैकी चार सेशन पूर्ण झाले आहेत. सहा सेशन पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा कॅन्सर स्कॅन होईल. मात्र तिसऱ्या सेशननंतर केलेल्या स्कॅनचा रिपोर्ट सकारात्मक आला. तरीही सहा पूर्ण सेशन होईपर्यंत वाट पाहावी लागणार. कारण तेव्हाच निकाल लागेल आणि मग पाहुयात आयुष्य मला कुठे घेऊन जातं ते,’ असं तो म्हणाला. त्यामुळे इरफानचे चाहते त्याच्यासाठी एकीकडे प्रार्थना करत असताना ही गोष्ट दिलासा देणारी आहे.

भविष्याची कोणतीही काळजी न करता आणि कोणत्याही योजना न आखता मुक्तपणे जगण्यास इरफान प्राधान्य देत आहे. याविषयी तो म्हणतो की, ‘आता मी कोणतेच प्लॅन्स करत नाही. कारण जीवनात कसलीच निश्चिती नाही. मी या आजारातून बरा होईन की नाही असं सुरुवातीला लोकांना वाटत होतं. पण माझ्या हातात काहीच नाही. आयुष्याला जे मंजूर असेल तेच होईल. मृत्यू मला कोणत्याही क्षणी कवटाळू शकतो. मग ते काही महिन्यांनी असो किंवा वर्षाने किंवा दोन वर्षांनी. इथे कसलीच शाश्वती नाही. पण या परिस्थितीने मला खूप काही शिकवलं आहे. तुम्ही भविष्याचा विचार करणं, प्लॅनिंग करणं सोडून देता. तुम्ही आयुष्याच्या दुसऱ्या पैलूकडे पाहायला लागता. आयुष्य खूप काही देतं आणि यासाठी आपल्याला आभारी असायला हवं.’

इरफानचा ‘कारवाँ’ हा चित्रपट उद्या (शुक्रवारी) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे.

Story img Loader