‘हमशकल्स’मधील भूमिकेबाबत सैफची स्पष्टोक्ती
एखाद्या चित्रपटातील स्वत:च्याच भूमिकेविषयी परखड मत मांडणे चित्रपटसृष्टीतील कलावंतांसाठी खरे तर घातक असते. मात्र, कलाकार कसलेला असेल आणि या मायावी दुनियेतला जुनाजाणता असेल तर त्याला तसे मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. असेच परखड मत व्यक्त केलंय ‘बुलेट राजा’ सैफ अली खान याने. साजिद खान दिग्दर्शित ‘हमशकल्स’ हा चित्रपट लिखित पटकथा नसलेला होता. त्यामुळे या चित्रपटातील विनोद आपल्या चाहत्यांना न पटणारे होते असे स्पष्ट करत यात भूमिका करणे हे चुकीचेच होते, असे सैफने म्हटले आहे.
अगदी अलीकडे म्हणजे जूनमध्ये ‘हमशकल्स’ प्रदर्शित झाला. यात सैफबरोबरच ‘लय भारी’ रितेश देशमुखही होता. या चित्रपटाने पहिल्या आठवडय़ात बऱ्यापैकी गल्लाही जमवला. मात्र, त्यानंतर तो तिकीटबारीवर सपशेल आडवा पडला. ‘हमशकल्स’मधील विनोदी प्रसंगांची निवड आणि त्याची मांडणी आपल्या चाहत्यांची बुद्धिमत्ता आणि आवड याच्या विपरीत होती, असे सांगून सैफ अली खानने साजिदकडेच अंगुलीनिर्देश केला आहे. चित्रीकरणासाठी लागणारी ‘शूटिंग स्क्रिप्ट’ नसतानाही आपण हा सिनेमा रितेश व साजिद यांची कंपनी मला आवडते म्हणूनच केल्याचे सांगत या चित्रपटात का काम केले याचे उत्तर दिले आहे. सैफच नव्हे तर बिपाशा बासू आणि ईशा गुप्ता यांनीही ‘हमशकल्स’मध्ये काम करूनही दूर राहण्याचा प्रयत्न केला. बिपाशाने तर चित्रपटाच्या प्रमोशनमध्येच सहभाग घेतला नाही आणि ईशा गुप्ताने तर आपल्या वडिलांनाच सांगून टाकले की कृपया हा चित्रपट पाहू नका. आता बोला. ज्या गोष्टीवर, कथेवर-पटकथेवर आणि पर्यायाने दिग्दर्शकावर आपला विश्वास नाही असा चित्रपट मुळातच स्वीकारायचा का? असो. एकूण काय तर सैफ अली खानचा कबुलीजबाब ऐकून अन्य कलावंतांनीही योग्य भूमिका निवडाव्यात किंवा सैफसारखा कबुलीजबाब तरी द्यावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा