‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये ‘गुत्थी’चे पात्र करणाऱ्या ‘स्टॅन्डप कॉमेडीयन’ सुनील ग्रोव्हरने काही दिवसांपूर्वी या शोपासून फारकत घेतली. तेव्हापासून त्याने हा शो का सोडला याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. परंतु, आता खुद्द सुनीलनेच आपण हा शो जास्त पैसे कमविण्यासाठी सोडल्याचा खुलासा केला आहे.
शोचा करार संपत आल्यामुळे आणि शोचे निर्माते व कपिल शर्मा त्याच्या मानधनात वाढ करत नसल्याने सुनीलने हा शो सोडल्याच्या बातम्या काही दिवसांपुर्वी माध्यमांत येत होत्या.
योग गुरू रामदेव बाबांनी पैसा हे शो सोडण्याचे कारण असल्याचे विचारता, सुनीलने प्रथम या प्रश्नाचे उत्तर द्यायला टाळाटाळ केली. रामदेव बाबांनी जास्त पैसे कमविण्याचा आशिर्वाद देत त्याला पुन्हा हा प्रश्न विचारला असता जास्त पैसे मिळविण्यासाठी हा शो सोडल्याचे सुनीलने बाबांना सांगीतले. आपण हा शो का सोडला हे सांगण्यात सध्या आपला वेळ जात असल्याचे देखील तो म्हणाला.
‘गुत्थी’ हे पात्र अन्य कोणी तयार केले नसून, आपल्या कॉलेजच्या दिवसात भेटलेल्या मुलीच्या हावभावांची ही नक्कल असल्याचा खुलासा त्याने केला. हरियाणातील दबवली खेडेगावातील पंजाबी हिंदू कुटुंबात जन्मलेल्या सुनीलला लहानपणापासूनच लोकांना हसविण्याची आवड होती. गावातील एका लग्नसमारंभात पहिल्यांदा त्याने एक विनोदी कलाकार म्हणून उपस्थितांना हसविले होते.

Story img Loader