अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोमध्ये तिने लावलेली हजेरी. कर्मवीर विशेष भागात ग्रामीण विकास चेतना संस्थेच्या रुमा देवी यांच्यासोबत सोनाक्षी हॉटसीटवर बसली होती. प्रश्नांची उत्तरे देण्यात रुमा देवी यांची मदत करण्यासाठी सोनाक्षीने ‘केबीसी’मध्ये सहभाग घेतला होता पण एका वेगळ्याच कारणामुळे ती ट्रोलिंगची शिकार झाली. एका साध्या प्रश्नाचं उत्तर तिला देता न आल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर चांगलाच निशाणा साधला. शुक्रवारी एपिसोड प्रसारित झाल्यानंतर ट्विटरवर #SonakshiSoDumb हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. त्यानंतर शनिवारी तिने या ट्रोलर्सना ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं.

”सतत जागे राहणारे प्रिय ट्रोल्स, मला तर पायथागोरसचे प्रमेय, व्हेनिसचे व्यापारी, मुघल राजवंशाचा कालक्रम अशा बराचशा गोष्टी लक्षात नाहीत आणि याशिवाय आणखी जे काही लक्षात नाही तेसुद्धा आठवत नाही. जर तुमच्याकडे काहीच काम नसेल आणि इतका वेळ असेल तर कृपया या सर्वांवर पण मीम्स तयार करा. माझं मीम्सवर खूप प्रेम आहे,” असा उपरोधिक टोमणा सोनाक्षीने ट्रोलर्सना मारला.

‘रामायणात दिलेल्या माहितीनुसार, हनुमानाने कोणासाठी संजीवनी आणले होते’, असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारला होता. या प्रश्नासाठी ‘A- सुग्रीव, B- लक्ष्मण, C- सीता आणि D-राम’ हे पर्याय दिले होते. या प्रश्नाचं उत्तर सोनाक्षी व रुमा देवी दोघींनाही ठाऊक नव्हतं. सोनाक्षीने सुरुवातीला तर सीता असा अंदाजही वर्तवला होता. अखेर उत्तर माहित नसल्याने तिने लाइफलाइनचा वापर केला. यावर नंतर बिग बींनीही आश्चर्य व्यक्त केला.

”तुझ्या वडिलांचे नाव शत्रुघ्न आहे, तुझ्या तिन्ही काकांची नावं राम, लक्ष्मण व भरत आहेत. इतकंच नाही तर तू ज्या घरात राहतेस, त्याचं नाव ‘रामायण’ आहे. तुझ्या दोन्ही भावंडांची नावं लव आणि कुश आहे. तरीसुद्धा तुला या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं,” असं म्हणत अमिताभ यांनी सोनाक्षीची फिरकी घेतली.