हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची भारत कुमार म्हणून देखील ओळख आहे. चित्रपटात तत्त्वनिष्ठ सामान्य माणसाची (आम आदमी) शक्तिशाली भूमिका साकारणारे मनोज कुमार म्हणतात, आम आदमी पक्षाकडून तरुणांच्या पुष्कळ अपेक्षा असल्याने, त्या पक्षाला त्यांची वचनपूर्ती करावी लागणार आहे.
देशातील जनता खासकरून तरुण पिढी जागृत होत असल्याचे पाहून आपल्याला आनंद होत असल्याचे ७६ वर्षीय मनोज कुमार यांचे म्हणणे आहे. आजचा तरुणवर्ग अतिशय जागृत असून, जनतेमध्ये क्रोध खदखदत आहे. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या रुपाने देशात भ्रष्टाचाराविरोधात त्सुनामी सदृष्य लाट उसळली आहे. देशात उठलेला हा उत्साह किती शक्तिशाली आहे आणि या मागे काय आहे, हे आपल्याला माहित नाही. त्यांनी (अरविंद) एक पाऊल उचलले आहे आणि आता त्यांना वचनपूर्ती करावी लागणार आहे. केजरीवाल हे एका न धुतलेल्या नवीन शर्टासारखे आहेत, ज्याला अजून धुण्याच्या प्रक्रियेतून जाणे बाकी असल्याचे मनोज कुमार म्हणाले. आजची राजकीय परिस्थिती ‘यादगार’ आणि ‘उपकार’ या आपल्या चित्रपटातून फार पूर्वीच दर्शविल्याचे देखील त्यांनी सांगितले.  मनोज कुमार म्हणाले, केजरीवालांच्याही अगोदर सामान्य माणूस आणि राजकारणातून झालेला त्याचा उदय यावर ‘यादगार’ या माझ्या चित्रपटातून मी भाष्य केले आहे. केजरीवाल हे माझ्यापेक्षा ४७ वर्षांनी लहान आहेत. या चित्रपटात भ्रष्टाचार, डॉक्टर पेशातील वाईट प्रवृत्ती आणि प्रस्थापित राजकिय परिस्थितीच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या माणसाची भूमिका मी साकारली होती. चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा कारखान्यात काम करणाऱ्या एका सामान्य माणसाची होती, जो राजकारणात प्रवेश करीत निवडणूक लढवून विजय प्राप्त करतो.
मनोज कुमार यांचे खरे नाव हरीकृष्ण गिरी गोस्वामी असून, १९५७ साली ‘फॅशन’ चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला होता. परंतु, १९६२ च्या ‘हरियाली और रास्ता’ चित्रपटाद्वारे त्यांना यश संपादन झाले. चार दशकांच्या चित्रपटसृष्टीतील वाटचालीत मनोज कुमार यांनी ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘शोर’, ‘दस नंबरी’ आणि ‘क्रांती’सारख्या अनेक चित्रपटांत निव्वळ भूमिका न साकारता दिग्दर्शनदेखील केले. १९९५ साली आलेला ‘मैदान-ए-जंग’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. आपल्या प्रसिद्धीचे श्रेय लोकांना देणारे मनोज कुमार आजच्या चित्रपटांविषयी जास्त संतुष्ट नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा