मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या अभिनेता आमिर खानने #Thugs Of Hindustan हा सिनेमा अपयशी ठरल्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे असे आता म्हटले आहे. आपल्याला ठाऊकच आहे की हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र पहिल्याच दिवशी या सिनेमाला लोकांनी सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले. आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ अशी मोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा तिकिटबारीवर सडकून आपटला. या सिनेमाला ओपनिंग चांगले मिळाले मात्र सिनेमाची कथा, मांडणी दमदार नसल्याने तो लोकांचे मनोरंजन करू शकला नाही.
या सगळ्या अपयशानंतर पहिल्यांदाच आमिर खानने या सिनेमाच्या अपयशाची सगळी जबाबदारी माझी असल्याचे म्हटले आहे. मुंबईत स्क्रिप्ट राइटिंग संदर्भातला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आमिरला Thugs Of Hindustan फ्लॉप झाल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आमिरने हा सिनेमा पडल्याची जबाबदारी माझी असल्याचे म्हटले आहे. लोकांनी माझ्या सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल्या होत्या मात्र मी त्या पूर्ण करू शकलो नाही हे माझे अपयश आहे.
लोकांना माझा ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा सिनेमा अजिबात आवडला नाही याची पूर्ण जबाबदारी माझी आहे मी ती स्वीकारतो असे आमिरने म्हटले आहे. सिनेमा पडला यात वाद नाही तरीही काही लोकांना तो आवडला, ज्यांना तो आवडला त्यांचे मी आभार मानतो मात्र लोकांनी माझ्या सिनेमाकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या मी पूर्ण करू शकलो नाही याचे मला वाईट वाटते आहे. जे अपयश आले त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. हा सिनेमा लवकरच चीनमध्येही प्रदर्शित होणार असल्याचे आमिरने यावेळी सांगितले. तिथे हा लोकांना आवडतो का? ते आता मी पाहणार आहे. मात्र भारतात सिनेमाला जे अपयश आले त्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे असेही आमिरने सांगितले.
आमिर खानचा ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा सिनेमा प्रदर्शित होऊन १७ दिवस झाले आहेत. या सिनेमाने कसाबसा १५० कोटींचा गल्ला जमवला आहे. दक्षिण भारतातल्या कमाईनंतर हे आकडे समोर आले आहेत. या सिनेमाला ५२ कोटींचे ओपनिंग मिळाले. मात्र २५ तारखेच्या रविवारी या सिनेमाने अवघे ३२ लाख रुपयेच कमावले आहेत असेही समजते आहे. ही संपूर्ण कमाई तामिळ, तेलुगु आणि हिंदी या तिन्ही आवृत्यांची मिळून आहे अशीही माहिती मिळते आहे. हिंदी भाषेचा विचार करता या सिनेमाची कमाई १४५ कोटीपर्यंतही पोहचलेली नाही. अनेक सिनेमागृहांमधून हा सिनेमा उतरवण्यात आला आहे. दोन दिवसांनी या सिनेमाने नेमके किती पैसे कमावले तेदेखील समोर येईल.