अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उद्योगपती राज कुंद्रा यांच्याशी २००९ साली लग्न केलं. १९९० च्या दशकामध्ये चित्रपट सृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या शिल्पा आज दोन मुलांची आई आहे. नुकतीच शिल्पाचे पती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणामध्ये आणि ते मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या गुन्ह्याखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मात्र या अटकेनंतर कुंद्रांसंदर्भातील अनेक गोष्टी चर्चेत असतानाच आता त्यांची एक जुनी मुलाखतही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी शिल्पासोबतच्या लग्नाच्या निर्णयापासून आपल्या तरुणपणीच्या आठवणींपर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं होतं.

नक्की वाचा >> पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच झाली व्यक्त; Instagram वर पोस्ट करत म्हणाली…

२०१३ साली फिल्मफेअरला राज कुंद्रा यांनी मुलगा विहानच्या जन्मानंतर मुलाखत दिलेली. त्यावेळी त्यांनी शिल्पासोबतच्या लग्नाबद्दल भाष्य करताना आपण हिच्याशी लग्न करणार असं मला फार आधीपासून वाटत असल्याचं म्हटलं होतं. “नजराजनर होऊन प्रेमात पडण्यापेक्षाही तिच्यामध्ये आणखीन काहीतरी मला फार भावलं होतं. ती मला एखाद्या परीप्रमाणे वाटायची. जशी माझ्याशी तिची ओळख वाढली तशी ती मला अधिक चांगली वाटू लागली. एक अभिनेत्री असल्याने ती मद्यप्राशन करत असेल किंवा धुम्रपान करत असेल असं अनेकांना वाटत असणार. मात्र ती यापैकी काहीही करत नाही. मी तिला माझ्या आई-वडिलांशी भेट घालून देण्यासाठी माझ्या घरी घेऊन गेलेलो. तिथेही ती फार उत्साही दिसली. ती त्यांच्या पायही पडली. मला तिच्या या कृतीचा आदर वाटतो. ती जेव्हा माझ्या पालकांच्या पाया पडली तेव्हाच मला ही मुलगी माझी पत्नी होऊ शकते, असं वाटलं,” अशी माहिती राज कुंद्रांनी मुलाखतीमध्ये दिली होती.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

शिल्पासोबत पहिल्यांदा झालेल्या भेटीबद्दलही कुंद्रा या मुलाखतीमध्ये बोलले होते. शिल्पाला पाहता क्षणी आपण तिच्या प्रेमात पडल्याचं राज कुंद्रांनी सांगितलं होतं. “मी जेव्हा हॉटेलमध्ये तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा ती तिच्या आईसोबत बसली होती. तेव्हाच मला ती फार आवडली होती. ती संस्कारी आणि चांगल्या विचारांची असल्याचं लगेच जाणवलं. मी पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडलो. मी तिला पाहिल्या पाहिल्याच मला आयुष्याची जोडीदार म्हणून हिची सोबत आवडेल हे जाणवलं,” असं राज मुलाखतीत म्हणाले होते.

नक्की वाचा >> २०१९ पासून बनवले १०० हून अधिक अश्लील चित्रपट, कोट्यावधींची कमाई अन्… राज कुंद्रा प्रकरणातील धक्कादायक खुलासे

गरीबीची चीड…

ही मुलाखत दिली होती तेव्हा राज आणि शिल्पा यांच्या लग्नाला चार वर्षे झाली होती. या मुलाखतीमध्ये राज यांनी त्यांच्या तरुणपणातील काळाबद्दलही भाष्य केलं होतं. “मी एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. माझे वडील ४५ वर्षांपूर्वी लंडनला स्थायिक झाले. तिथे ते बस कंडक्टर म्हणून काम करायचे आणि माझी आई कारखान्यामध्येै काम करायची. आमचं आयुष्य तेव्हा फार खडतर होतं. मी १८ व्या वर्षी कॉलेज सोडल्यापासून स्वत: हे सारं हिंमतीवर कमवलं आहे. जेव्हा जेव्हा शिल्पा मला बेजबाबदारपणे पैसे खर्च करताना पाहता तेव्हा मी तिला सांगतो की मला मी कमवलेल्या पैशांमधून आनंद उपभोगण्यात काहीच चूक वाटत नाही. मला गरीबीचा फार द्वेष होता. त्यामुळेच मला श्रीमंत व्हायचं होतं, माझ्यातील या द्वेषामुळेच मी यश मिळवू शकतो,” असं कुंद्रा म्हणाले होते.

नक्की वाचा >> अटकेनंतर राज कुंद्रांनी पहिल्यांदाच न्यायालयासमोर मांडली भूमिका, म्हणाले, “तो कंटेट पॉर्न नाही तर…”

ब्रिटीश नागरिक ते हिरे व्यापारी…

राज कुंद्रा यांचे वडील हे लुधियानामधून ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्यानंतर लंडनमध्ये राज यांचा जन्म झाल्याने ते ब्रिटीश नागरिक आहेत. राज कुंद्रा हे कॉलेज ड्रॉप आऊट असून त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच शिक्षण सोडलं. २००४ साली सक्सेस मॅगझीनने त्यांना ब्रिटनमधील १९८ वे सर्वात श्रीमंत आशियाई व्यक्ती म्हणून श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान दिलेलं. नेपाळ भेटीनंतर आपलं आयुष्य बदलल्याचं राज कुंद्रा सांगतात. नेपाळ भेटीदरम्यान त्यांनी पश्मीना शाली विकत घेऊन त्या युनायटेड किंग्डममध्ये विकण्यास सुरुवात केली आणि तिथूनच त्यांच्यातील उद्योजकाचा खऱ्या अर्थाने जन्म झाला. हळूहळू राज यांनी हिरे व्यापार सुरु केला. त्यांनी बेल्जियम, रशिया यासारख्या देशांमध्ये व्यापार सुरु केला. त्यांनी आरके कलेक्शन्स लिमिटेड नावाची कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्मयातून ते लंडनमधील फॅशन हाऊसेसला महागडे कपडे विकू लागले. या उद्योगामुळे ते फार श्रीमंत झाले.

Story img Loader