तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तुनिषाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ती नैराश्यात गेली होती. शिझान खानला तिच्या आत्महत्येनंतर अटक करण्यात आली आहे. या दोघांचं ब्रेक अप पंधरा दिवसांपूर्वी झालं होतं. त्यानंतर निराश होऊन तुनिषाने आत्महत्या केली असा आरोप तुनिषाच्या आईने केला. त्यानंतर पोलिसांनी शिझान खानला अटक केली. आता या प्रकरणी शिझान खानने एक खुलासा केला आहे.
श्रद्धा वालकर प्रकरणामुळे अस्वस्थ झाल्याचं शिझानचं म्हणणं
संपूर्ण देशात गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे मी अस्वस्थ झालो होतो. त्यानंतरच मी तुनिषासोबत ब्रेक अप करण्याचा निर्णय घेतला. आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे मला ठाऊक आहे मात्र आपल्याला पुढे काही निर्णय घ्यायचा असेल तर धर्म आड येऊ शकतात हे मी तुनिषाला सांगितलं आणि तिच्यासोबत ब्रेक अप केलं. तसंच मी तुनिषाला हेदेखील सांगितलं की आपल्यात वयाचं अंतरही बरंच आहे. या दोन कारणांमुळे मी ब्रेक अप केलं असं शिझानने पोलिसांना सांगितलं आहे.
तुनिषाने याआधीही केली होता आत्महत्येचा प्रयत्न
आमचं ब्रेक अप झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीही तुनिषाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी मी तिचा जीव वाचवला. तुनिषाच्या आईला मी भेटलो आणि तुमच्या मुलीकडे तुम्ही लक्ष ठेवा तिची काळजी घ्या असंही मी त्यांना सांगितलं होतं असंही शिझानने पोलिसांना सांगितलं.
तुनिषा प्रकरण लव्ह जिहादचं असल्याचाही संशय
तुनिषा शर्मा आणि शिझान खान यांचं प्रेम प्रकरण हे लव्ह जिहादचं असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येते आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी यासंदर्भातला आरोप केला होता. त्यानंतर भाजपने या प्रकरणी असाही काही अँगल होता का? हे तपासलं जावं असं म्हटलं आहे.
२० वर्षांच्या तुनिषाने ‘अलिबाबा’ मालिकेच्या सेटवर मेकअप रुममध्येच गळफास घेतला. तुनिषाने कथित बॉयफ्रेंड शिझान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर १५ दिवसांनी आत्महत्या केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात शिझानला पहिला आरोपी म्हणून अटक करण्यात आली. मात्र तुनिषाने आधीही आत्महत्येचा प्रयत्न केला आणि आपण तिला वाचवलं होतं असं शिझानने सांगितलं आहे. तसंच श्रद्धा वालकर प्रकरणामुळे आपण ब्रेक अपचा निर्णय घेतला असंही त्याने पोलिसांनी सांगितलं आहे.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण काय आहे ?
मुंबई जवळच्या वसईतील असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्याच लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली. श्रद्धा वालकरच्या हत्येनं देशभरात खळबळ उडाली होती. आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले होते.श्रद्धा वालकरची हत्या केल्याप्रकरणी आफताब पूनावाला सध्या तुरुंगात असून, दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आफताब पूनावालाविरुद्ध पुरावे गोळावे करण्याचं काम दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.