‘खान’ नाव आहे म्हणून आपली अडवणूक का केली जाते?, या प्रश्नावर विविध माध्यमातून राग, चीड व्यक्त करून शाहरूख थकला. त्याच्याच बाबतीत ही ओरड का होते, बाकीच्या ‘खान’ कलाकारांना अमेरिकेत किंवा अन्यत्र कुठे त्रास होत नाही का?, असे कित्येक प्रश्न विचारले गेले. मात्र, तेव्हा कुठल्याही अन्य कलाकाराने तोंड उघडले नव्हते. ‘लाईफ ऑफ पाय’, ‘स्पायडर मॅन’ सारख्या हॉलिवुड चित्रपटात काम केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिचित असलेल्या इरफान खाननेही आपल्याला खान आडनावामुळे अमेरिकेत विमानतळावर अडवणूक केली गेली असल्याचे स्पष्ट केले आहे.
एका दूरचित्र वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इरफानने ‘खान’ नावामुळे दिल्या जाणाऱ्या वागणूकीबद्दल आपला राग व्यक्त केला.
मी चित्रपटात माझ्या ‘खान’ या आडनावाचा उदो उदो करत नाही. लोक मला इरफान म्हणूनच ओळखतात. पण, पारपत्रावर तुमचे आडनाव आणि धर्म नमूद करणे बंधनकारक असल्याने तिथे ‘खान’ हा उल्लेख येतोच. मला एकदा नाही तर कित्येकदा अमेरिकेत विमानतळावर अडवले गेले आहे. एकदा तर मी त्यांना चिडून विचारलेही होते की आम्हाला जर अमेरिकेत प्रवेशच द्यायचा नसेल तर तुम्ही आमचे पारपत्र मंजूरच का करता? त्यावर त्या अधिकाऱ्याने मला धमकी देतो आहेस का असे विचारत फैलावर घेण्यास सुरूवात केली, असल्याचे इरफान म्हणाला.
लॉस एंजेलिसमध्ये २००८ साली, लागोपाठ २००९ साली न्यूयॉर्क विमानतळावर मला अडवण्यात आले होते. विमानतळावर मोठे मोठे बंदूक घेतलेले अधिकारी तुम्हाला बाजूला एका खोलीत घेऊन जातात. तिथे ते तुम्हाला भ्रमणध्वनी वापरू देत नाहीत, परिचितांशी बोलू देत नाहीत की आजूबाजूच्यांशी बोलू देत नाहीत.
बराच वेळ एक टेपणाने काढल्यानंतर संबंधित अधिकारी येऊन आता तुम्ही घरी जाऊ शकता, असे सांगतात. का थांबवले? काय तपास केलात आणि आता का सोडता?, तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे ते देत नाहीत. मी या प्रकारांना एवढा वैतागलो आहे की जर मला अमेरिके त कोणी बोलावलेच तर मी त्यांना स्पष्ट सांगतो की अशाप्रकारे मला विमानतळावर अडवले गेले तर मी आल्यापावली भारतात परतेन’,
शाहरूखने ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातूनही हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. ‘माय नेम इज खान बट आय अॅम नॉट टेररिस्ट’, असे वाक्य शाहरूख या चित्रपटात ऐकवतो. आता वास्तवातही या कलाकारांना हीच भूमिका घेऊन पाऊल उचलावे लागणार असे दिसते.
माय नेम इज ‘खान’चे हे दुखणे आत्ताचे नाही कित्येक वेळा आपल्याला या प्रकाराला सामोरे जावे लागले असून विमानतळावरचे अधिकारी या अडवणूकीमागचे कारणही स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे अधिक संताप येतो. – इरफान खान