प्रसिद्ध हॉलीवूडपट ‘नाइट अॅण्ड डे’चा भारतीय अवतार असलेल्या ‘बँग बँग’च्या चित्रीकरणाला अभिनेता हृतिक रोशन आणि कतरिना कैफला घेऊन जोरदार सुरुवात झाली खरी, पण हृतिकच्या मेंदूवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्याला निदान महिन्याभराचा तरी ‘ब्रेक’ लागला आहे. चित्रीकरणादरम्यान स्टंट करताना डोक्याला कधीतरी ‘बँग बँग’ झाले होते मात्र ते उशिरा लक्षात आल्यानंतर थेट शस्त्रक्रियेलाच सामोरे जावे लागले. आता शस्त्रक्रियेमुळे हृतिकची जखम बरी झाली असली तरी या घटनेमुळे तो कमालीचा सावध झाला आहे. स्टंट दृश्ये देण्यासाठी नेहमीच तयारीत असणाऱ्या हृतिकने यापुढे अशी दृश्ये करताना जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचे आश्वासन आपल्या घरच्यांना दिले आहे.हृतिक वर शस्त्रक्रिया करावी लागणार, या बातमीने त्याच्या घरच्यांना चिंतेत टाकले होते. त्याच्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर घरच्यांनी सुटकेचा श्वास टाकला असला तरी आपल्यामुळे घरच्यांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागले याची जाणीवही त्याला झाली आहे. माझ्या डोक्याला मार कधी बसला, नेमके मी काय चित्रीकरण करत असताना हा मार लागला याची मलाच काही माहिती नाही. त्यामुळे मला झालेल्या दुखापतीसाठी कोणाला जबाबदार धरणे योग्य होणार नाही. ‘बॅंग बॅंग’चे चित्रीकरण करताना मला दुखापत झाली असेही म्हणणे मला उचित वाटत नाही, असे हृतिकने स्पष्ट के ले आहे. मेंदूमध्ये अशी कोणती यंत्रणाही नाही जिच्यामुळे दुखापत नेमकी कशामुळे झाली, हे निश्चितपणे समजू शके ल. त्यामुळे कोणालाही दोष न देता झाली गोष्ट विसरून कामाला लागले पाहिजे, असे हृतिकने म्हटले आहे.मात्र यापुढे स्टंट करताना आपण स्वत:च योग्य ती खबरदारी घेऊ, असे आश्वासनही त्याने दिले आहे. टॉम क्रुझ आणि कॅमेरॉन डियाज या हॉलीवूड कलाकारांनी गाजवलेल्या ‘नाइट अॅण्ड डे’चा भारतीय रिमेक असणाऱ्या ‘बॅंग बॅंग’ चित्रपटात हृतिक आणि कतरिना दोघांनाही स्टंट्स करावे लागणार आहेत. बिग बजेट आणि तांत्रिकदृष्टय़ाही कमालीचा खर्चिक असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ राज आनंद याने केले असून सध्या युरोपमध्ये त्याचे चित्रीकरण सुरू आहे.