‘दबंग गर्ल’ म्हणून प्रकाशझोतात आलेली सोनाक्षी सिन्हा आता बॉलीवूडमध्ये चांगलीच स्थिरावली आहे. ‘सलमान खान गर्ल’ या नावाने तिची ओळख आजही सर्वश्रुत आहे. बॉलीवूडमध्ये येण्याआधी सोनाक्षीच्या वजनाची चर्चा सर्वत्र खूप रंगत असे. सलमानने तिला काही टिप्स दिल्या आणि तिचे वजन कमी झाल्यावर आपल्याच चित्रपटाद्वारे संधीही दिली. असे असले तरी ही दबंग गर्ल पडद्यावरही आपल्याला चांगलीच हट्टीकट्टी दिसली. चांगल्या अशा पंजाबी ड्रेसमध्ये आणि साडीमध्ये सोनाक्षीला आपण आतापर्यंत पाहिले आहे. मात्र आता आपण सोनाक्षीला पाहणार आहोत पाश्चात्त्य स्टाइलच्या कपडय़ांमध्ये..
याचे कारण म्हणजे सध्या सोनाक्षीला वेध लागलेत ‘मॉडर्न’ होण्याचे. याकरिता तिने जय्यत तयारीही सुरू केली आहे. सुरुवातीला खाण्यावर अजिबात नियंत्रण न ठेवणाऱ्या सोनाक्षीने आता चक्क योग्य आहारावर भर दिला आहे. आपल्यालाही फिगर असावी, असे तिला वाटू लागले आहे. त्यामुळे व्यायामावरही तिने भर दिला आहे. त्यामुळे भविष्यात सोनाक्षी मॉडर्न दिसण्याबरोबरच स्लिमट्रिम दिसली तर आश्चर्य वाटायला नको, असे निकटवर्तीय सांगत आहेत.
सोनाक्षीची प्रॉपर डाएट टीम तिच्यासोबत चित्रीकरणाच्या वेळीही हजर असते. तिच्या खाण्याकडे लक्ष देऊन असलेली ही टीम तिच्यासाठी रोजचा डाएट प्लॅन तयार करीत आहे. सोनाक्षीच्या शरीरावर वेस्टर्न आऊटफिट कुठले चांगले दिसतील याकरिता काही स्टायलिस्टही कामाला लागले आहेत. पाश्चात्त्य पद्धतीच्या कपडय़ांमध्ये लीलया वावरता यावे म्हणून तिचे चालणे वा केसांची पद्धत आदींसाठीही म्हणे स्वतंत्र पथक कार्यरत आहे.  
करीना कपूरकडे बघून सोनाक्षीला हे मॉडर्न होण्याचे वेड लागले आहे. बॉलीवूडमध्ये पाश्चात्त्य वस्त्रांमध्ये सुंदर दिसणारी अभिनेत्री म्हणून करीना कपूरला सर्वच जण ओळखतात. पाश्चात्त्य वस्त्रांच्या जोडीला करीनाची एकूणच फॅशनची जाणही खूप उत्तम असल्याचे आपल्याला माहीतच आहे. करीनाच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी सोनाक्षी आता सज्ज होत आहे. अर्थात सोनाक्षीसाठी हे आव्हान नक्कीच खूप खडतर असल्याचे बोलले जात आहे. तिला या नव्या अवतारात प्रेक्षक स्वीकारतील की नाही, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.