अभिनेता सलमान खान अद्याप अविवाहित असून तो विवाह कधी करणार याची चर्चा नेहमीच बॉलीवूडच्या कलावंतांमध्ये तसेच प्रेक्षकांमध्ये केली जाते. आमिर खाननेही सलमानने लवकर विवाह करावा असे मत यापूर्वीच व्यक्त केले होते. परंतु, बॉलीवूड स्टार सलमान खानविरोधात जोधपूर आणि मुंबई न्यायालयात खटले सुरू आहेत. त्या खटल्यांचे निकाल लागल्यानंतरच विवाह करण्याचा विचार आहे, असे मत सलमान खानने व्यक्त केले. वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नावर त्याने हे उत्तर दिले आहे.
बॉलीवूडमध्ये सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत वेळोवेळी जोडले गेले असले तरी विवाहाबाबत त्याने कोणतीही भूमिका आतापर्यंत जाहीर केली नव्हती. अलीकडेच त्याचे कतरिना कैफसोबत असलेले संबंध संपुष्टात आले.
आपल्या विवाहाबाबतचा विचार मांडताना सलमान खान म्हणाला की, न्यायालयांच्या निकालानंतरच विवाहाचा विचार करायचे मी ठरविले आहे. निकाल माझ्याविरोधात गेला आणि तुरुंगात जावे लागले तर तुरुंगातून बाहेर आल्यावरच मी विवाह करीन, असेही त्याने स्पष्टपणे सांगितले.
काळवीट शिकार केल्याबद्दल जोधपूर न्यायालयात सलमानविरुद्ध खटला सुरू आहे. १९९९ साली ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजस्थानात गेला असताना सलमानने काळवीटाची शिकार केली होती. तर २००२ मधील वाहन अपघात प्रकरणाबद्दल मुंबई न्यायालयातही त्याच्याविरोधात खटला सुरू आहे.
दोन्ही खटल्यांमधून मी दोषमुक्त होईन अशी मला आशा आहे. परंतु, निकालांपूर्वी लग्न केले तर ते योग्य ठरेल का? समजा तसेच काही घडले आणि मला तुरुंगात जावे लागले तर माझ्या पत्नीला माझ्या मूलासह तुरुंगात भेटायला यावे लागेल, ते तरी योग्य असेल का? असे प्रतिप्रश्न विनोदाने करून सलमान खानने मल्लिनाथी केली.
सध्या सलमान खानचा ‘दबंग २’ हा चित्रपट तुफान गर्दी खेचत आहे. अॅक्शनपट त्याने केला असला तरी मारामारी, स्टण्ट्स न  करण्याचा सल्ला त्याला डॉक्टरांनी दिला आहे. त्याच्या मेंदूमधील रक्ताच्या गाठीबद्दल सलमान खानला विचारले असता तो म्हणाला की, स्टण्ट दृश्ये करणे मी पूर्णपणे थांबवले किंवा स्टण्ट्स करू शकलो नाही तर चित्रपटात काम करणे मी थांबवेन. कारण शेवटी माझे स्टण्ट्स पाहण्यासाठीच प्रेक्षक चित्रपटगृहात येतो याची मला जाणीव आहे, असेही सलमान खानने मोकळेपणी सांगितले.

Story img Loader