टि्वटरकरांनी खरपूस समाचार घेतलेल्या हमशकल्स चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानबरोबर पुन्हा काम करणार नसल्याचे अभिनेत्री बिपाशा बसूने ठरवले आहे. याआधी हमशकल्स चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमापासून तिने स्वत:ला दूर ठेवले होते. टिकेचा धनी ठरलेल्या या चित्रपटातील सहा व्यक्तिरेखांपैकी एक व्यक्तिरेखा साकारलेल्या बिपाशाने चित्रपटाचे सह-निर्माते वासू भगनानी आणि फॉक्स स्टार स्टुडिओ यांच्याबाबत आपली काही तक्रार नसल्याचे सांगितले. परंतु, जेव्हा आवश्यकता होती, तेव्हा हमशकल्स चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यकमाविरोधात आपण भूमिका मांडल्याबद्दल तिला आत्मसमाधान मिळत आहे. “चित्रपटाचे अंतिम स्वरूप पाहून मी खूप व्यतिथ झाले. प्रामाणिकपणे चित्रपटाची प्रसिद्धी कशी करावी हे समजत नाही.” अशा शब्दात त्यावेळी तिने भावना व्यक्त केल्या होत्या. पुन्हा साजिद खानबरोबर चित्रपट करणार का या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, नाही, पुन्हा मी त्याच्याबरोबर काम करणार नाही. वासू भगनानी आणि फॉक्स स्टार स्टुडिओ यांच्याबाबत माझी काहीही तक्रार नाही. या चित्रपटासाठी त्यानी खूप खर्च सोसला आहे आणि मी त्यांचा आदर करते. वासुजी माझ्यासाठी खास असून, चित्रपटाच्या प्रसिद्धी मंचावर येऊन खोट बोलायच नव्हतं आणि बावळटासारखं वागण पण मला जमलं नसतं. मला खोटं बोलता येत नाही. त्यामुळे मी ही भूमिका घेतली. अशी परिस्थिती क्वचितच येते, असे सांगत बिपाशा म्हणाली, बऱ्याच काळापासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे. अनेकजणांबरोबर मी काम केले असून, माझ्या विरोधात कोणाचीही तक्रार नाही. हमशकल्स चित्रपटाची निवड हा चुकीचा निर्णय होता. संपूर्णपणे विश्वासावर मी हा चित्रपट स्विकारला होता. या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमापासून मी स्वत:ला दूर का ठेवले हे ज्यांनी कोणी हा चित्रपट पाहिला असेल त्यांना कळेल. यात केवळ सहा मिनिटांसाठीच मी दिसते आणि मी काय काय करते ते माझे मलाच कळत नाही. या चित्रपटात सैफ अली खान, राम कपूर, रितेश देशमुख, तमन्ना भाटिया आणि इशा गुप्ता यांच्यादेखील भूमिका आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा