दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूला ओळखले जाते. महेश बाबूने अभिनयासोबत आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झालेला हा अभिनेता नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. नुकतंच महेश बाबूने हिंदी सिनेसृष्टीला मी परवडणार नाही. त्यामुळे हिंदी चित्रपट करुन मला माझा वेळ फुकट घालवायचा नाही, असे वक्तव्य केले होते. यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आहे.
महेश बाबू हा नेहमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. नुकतंच त्याने मला बॉलिवूडमधून फार जास्त ऑफर मिळालेल्या नाहीत. पण मला वाटत नाही की त्यांना मी परवडेन आणि मला अशा सिनेसृष्टीत काम करायचे नाही ज्यांना मी परवडत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने तेलुगू चित्रपट आणि हिंदी सिनेसृष्टी याबद्दल भाष्य केले आहे.
नुकतंच अभिनेता अदिवी शेष याची प्रमुख भूमिका असलेला मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या चित्रपटाच्या निमित्ताने महेश बाब निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी प्रदर्शित होणार आहे. हैदराबादमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला महेश बाबू, सई मांजरेकर, प्रकाश राज, मुरली शर्मा यांसारखे अनेक दिग्गज उपस्थित होते.
या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचनंतर एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पत्रकार परिषद खास मुंबई, बंगळुरु, दिल्ली यांसह इतर शहरातून आलेल्या हिंदी भाषिक पत्रकारांसाठी ठेवण्यात आली होती. मात्र हिंदी पत्रकारांसाठी स्वतंत्रपणे घेतलेल्या या पत्रकार परिषदेत महेश बाबू हिंदीतून एक शब्दही बोलले नाहीत. यावेळी त्यांना पत्रकारांनी हिंदी सिनेसृष्टीबद्दल विविध प्रश्न विचारले. मात्र त्यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. यावेळी तो फक्त इतकंच म्हणत होता की, सलमान खान हा माझी पत्नी नम्रता शिरोडकरचा चांगला मित्र आहे. तो लवकरच मेजर चित्रपटाचा हिंदी ट्रेलर लाँच करणार आहे.
‘महेशबाबू मराठीमध्ये बोलू शकतात का?’ चाहत्याच्या प्रश्नावर पत्नी नम्रता म्हणाली…
एस. एस. राजमौली यांच्यासोबत लवकरच तो एक चित्रपट करणार आहे. मात्र त्यात कोणत्याही हिंदीतील अभिनेत्रीला घेऊ नका, अशी अट महेश बाबूंनी घातली होती. त्याबद्दल या पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “कोणालाही तेलुगू चित्रपट करण्याबद्दल बंधन घालण्यात आलेले नाही. ज्याला काम करायचे आहे त्याने यावे आणि करावे. आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. पण ती व्यक्ती हिंदी चित्रपट करणार नाही. हा माझा ठाम निर्णय आहे.”
“मी फक्त तेलुगू चित्रपट करणार आहे. तुम्हाला हवे असले तर तुम्ही ते हिंदीत डब करुन प्रदर्शित करा. तेलुगू चित्रपट देशभरात प्रदर्शित व्हायल पाहिजेत, असे मी गेल्या १० वर्षांपासून सांगत आहे आणि आता माझे ते शब्द खरे ठरत आहेत. देशभरातील लोकांना तेलुगू चित्रपट आवडायला लागले आहेत”, असेही तो म्हणाला.