‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक हे कर्करोगाशी झुंज देत आहेत. दरम्यान, नट्टू काका आता ठीक असून ते मुंबईत पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात करण्याची प्रतिक्षा करत आहेत, असे त्यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घनश्याम यांनी ‘ईटाइम्स’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या उपचाराबद्दल आणि करोना परिस्थितीबद्दल सांगितलं. “मी अगदी ठीक आहे. हा इतका मोठा मुद्दा नाही. खरं तर, उद्या तुम्ही मला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एपिसोडमध्ये पाहू शकणार आहात. हा एक विशेष एपिसोड आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना माझं काम पुन्हा आवडेल,” असे घनश्याम म्हणाले.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

आपल्या उपचारांविषयी बोलताना घनश्याम म्हणाले, “हो, उपचार सुरु आहेत आणि मला आशा आहे की मी लवकरच पूर्णपणे ठीक होईल. उद्याचा एपिसोड संपल्यानंतर मला आशा आहे की लवकरच मुंबईत चित्रीकरणाला सुरुवात होईल आणि मला काम करायला मिळेल. पुन्हा काम करण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. मी प्रत्येक महिन्याला केमोथेरपी घेत आहे. डॉक्टरांनी मला सांगितले की मी काम करू शकतो. मला फक्त सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची आहे की मी ठीक आहे.”

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

घनश्याम पुढे करोना परिस्थितीवर बोलताना म्हणाले, “गेल्या वर्षीपासून करोनामुळे परिस्थिती ही बदलली आहे आणि करोना इथेच राहणार आहे. याचा अर्थ असा नाही की मी घाबरेल आणि घरात बसेन. मी सकारात्मक विचार करणारा आहे आणि मी निराश होऊ शकतं नाही किंवा नकारात्मक विचार करत नाही. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I would like to die with makeup on nattu kaka of taarak mehta ka ooltha chashma amid cancer battle dcp