अतुल कुलकर्णी या नावाला मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळं स्थान आहे.  ‘जंजीर’च्या प्रोमोज्मधून अचानक समोर येणारा अतुल कुलकर्णीचा चेहरा जसा त्याच्या चाहत्यांना सुखावतो तसाच ‘पोपट’ चित्रपटातील त्याचा वेगळा ‘लूक’ही आपल्याला खुणावतो. आणि त्याच वेळी ‘सावधान मुंबई- फाइट्स बॅक’सारख्या कार्यक्रमातून तो सूत्रसंचालन करणार हे ऐकल्यावर त्याच्यासारख्या अभिनयसंपन्न नटातला वैचारिकपणाही प्रखरपणे जाणवतो..
या वेगवेगळ्या निमित्तांनी अतुलशी मारलेल्या गप्पा-

प्रश्न : ‘पोपट’सारखा ग्रामीण पाश्र्वभूमी असणाऱ्या कथेवरचा चित्रपट स्वीकारताना नेमका काय विचार होता?
उत्तर : ‘पोपट’ चित्रपटातील कथेची पाश्र्वभूमी ग्रामीण आहे, असं म्हणूया आपण. पण माझ्या मते तुमची कथा जितकी मातीतली असते तितकी ती वैश्विक स्तरावर लोकांना भावते. इराणी चित्रपट किंवा तत्सम चित्रपट आपल्याला का भावतात, कारण ते तिथल्या स्थानिक भावभावनांशी जोडलेले असतात. आणि त्या भावभावना जितक्या स्थानिक असतील तितक्या त्या लोकांना आपल्याशा वाटतात. ‘वळू’मध्येही ते होतं. ‘वळू’ एका अर्थाने अत्यंत स्थानिक विषयावरचा चित्रपट होता. पण त्याला जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रियातल्या चित्रपट महोत्सवांमध्येही भरभरून प्रतिसाद मिळाला आणि अगदी मुंबईतल्या नरिमन पॉइंटच्या मल्टिप्लेक्सपासून ते सांगलीतल्या चित्रपटगृहापर्यंत सगळ्या प्रेक्षकांना तो तितकाच आवडला. ही प्रादेशिक चित्रपटांची ताकद आहे. म्हणजे आपली जी गोष्ट आहे ती आपण आपल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच ती जगाला आवडते हे मी ‘वळू’च्या अनुभवावरून ठामपणे सांगतो. ‘नटरंग’च्या बाबतीतही हेच म्हणता येईल आणि सतीश राजवाडेच्या ‘पोपट’ चित्रपटातही तीच ताकद आहे असं मला वाटतं. या चित्रपटात मी एक साधा छायाचित्रकार आहे. लग्न समारंभ चित्रित करण्यासाठी मी एक व्हिडीओ कॅमेरा विकत घेतो आणि याच जोरावर मी माझ्या तीन मित्रांच्या कामात सामील होतो. त्यांच्याबरोबर चित्रपट करता करता कथा एका वळणावर येऊन पोहोचते.

प्रश्न : एक कलाकार म्हणून पटकथा विकसनाच्या प्रक्रियेत सहभागी होणं किती आवश्यक असतं?
उत्तर : पटकथेच्या प्रवासात माझं सहभागी असणं ही ती कथा नेमकी कोणत्या स्वरूपात माझ्याकडे येते यावर अवलंबून असतं. ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट कथा स्वरूपात माझ्याकडे आला, त्याचं कथाबीज मला आवडलं आणि मग ते पटकथेत उतरवूया असं म्हणत सुरुवात झाली. त्यामुळे पटकथालेखनाच्या प्रक्रियेत मी सहभागी नसतो. परंतु, त्या पटकथेवरची चर्चा असेल किंवा मत मांडणं असेल यामध्ये सहभाग घेण्याचा माझा नक्की प्रयत्न असतो. ‘रंग दे बसंती’ चित्रपटाच्या पटकथेचे आठ-नऊ ड्राफ्ट माझ्याकडे आहेत. राकेश मेहरा प्रत्येक ड्राफ्ट झाला की आमच्याकडे पाठवायचे. मग एकत्र जमून ते वाचून घ्यायचे आणि त्यांच्यावर आम्ही मांडलेली मतं त्यांचा साहाय्यक लिहून काढायचा. मग पुन्हा एकदा दुसरा ड्राफ्ट असे करत करत ही प्रक्रिया चालू राहायची. पटकथालेखनाच्या प्रक्रियेतला टीमचा सहभाग हा तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करतो. एक म्हणजे त्या पटकथेला एकाच वेळी वेगवेगळे दृष्टिकोन मिळत असल्यामुळे ती सशक्त होते. दुसरी गोष्ट कलाकार म्हणून सुरुवातीपासून त्या चित्रपटाशी माझी भावनिक गुंतवणूक होत जाते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेमुळे चित्रपटाच्या ‘थीमचे बॉण्डिंग’ घट्ट होते.
खरं सांगायचं तर पटकथालेखनाच्या प्रक्रियेपासून टीमचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो आणि जो चांगला दिग्दर्शक असतो तो कधीच आपली कथा कडीकुलपात बांधून ठेवत नाही. तो पहिल्यापासून चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेबाबत लोकशाहीवादी असतो. त्याला माहिती असतं की अंतिम काय सांगायचंय हा निर्णय त्याचा आहे. दिग्दर्शकाचं आपल्या चित्रपटाच्या बाबतीत लोकशाहीवादी असणं हे नेहमीच त्याच्या चित्रपटाला मदत करतं, असा माझा अनुभव आहे. आणि मोठमोठय़ा दिग्दर्शकांच्या बाबतीत काम करताना मी हे जवळून अनुभवलेलं आहे.

प्रश्न : ‘पोपट’ चित्रपटातील ‘लूक’विषयी..
उत्तर : ‘पोपट’मधील माझा जो ‘लूक’ आहे तो मी आजवर पडद्यावर कधी बघितलेला नाही. त्यामुळे मला स्वत:लाच एक उत्सुकता आहे. याच्याआधी ‘प्रेमाची गोष्ट’ नुकताच येऊन गेला. त्यात माझा ‘फ्रेश लूक’ होता आणि एकाच वर्षांत ‘पोपट’सारखा चित्रपट ज्यात माझी अगदी वेगळी भूमिका आहे, वेगळा ‘लूक’ आहे. एकाच वर्षांत आलेल्या या दोन टोकाच्या माझ्या भूमिकांना लोक काय प्रतिसाद देतात याबद्दलची उत्सुकता मला आहे.

प्रश्न : ‘पोपट’ चित्रपटात तू तीन तरुण मुलांबरोबर काम केलंयस. त्याबद्दल काय सांगशील..
उत्तर : आजच्या तरुण मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप वेगळं काही सुचविणारा आहे. ‘पोपट’मधील कलाकार आणि मी आमच्यामध्ये जवळजवळ २०-२२ वर्षांचे अंतर आहे. ही जी आजची पिढी आहे त्यांना मिळणारं स्वातंत्र्य आणि त्यांना मिळणारी संधी यातून त्यांना जो आत्मविश्वास येतो ना तो इतकी र्वष काम करूनही माझ्यात नाही. त्यामुळे मला या पिढीचा हेवा वाटतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची प्रचंड ऊर्जा. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या ऊर्जेशी जुळवून घेणं ही माझ्यासाठी खूप मोठी कसरत होती. त्यांच्याबरोबर काम करताना मला स्वत:ला खूप वेगळ्या पद्धतीने कसब लावावं लागलं. तो जो अनुभव आहे तो मला खूप काही शिकवून गेला. स्वत:चा पुनशरेध घेणं म्हणजे काय याचा अनुभव ‘पोपट’च्या निमित्ताने मला मिळाला.

प्रश्न : आमिरसारख्या चोखंदळ नटांबरोबर काम करणाऱ्या अतुलला शाहरूख-सलमानच्या चित्रपटात काम करायला आवडेल का?
उत्तर : सलमान आणि शाहरूखसोबत काम करायला मिळालं तर ती भूमिका मी आनंदाने स्वीकारेन. त्याचं कारण असं की आपल्याकडे चित्रपटांचा विचार करताना समाजाचे विविध घटक आहेत त्यांचाही विचार केला पाहिजे. सलमान किंवा शाहरूख ज्या प्रेक्षकांना आवडतात असा मोठा प्रेक्षकवर्ग आपल्या देशात आहे आणि ती त्यांची सांस्कृतिक गरज आहे हे आपण विसरता कामा नये. आपण जेव्हा चित्रपट उद्योगाचा एक भाग असतो त्या वेळी आपल्याच एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून समाजाचा विचार करणे चुकीचे आहे असे मला वाटते. आणि त्याहीपुढे जाऊन म्हणायचं तर गंभीर चित्रपटांमध्येही चांगले-वाईट असतात, तसेच व्यावसायिक चित्रपटांमध्येही चांगले-वाईट चित्रपट असतात. चांगल्या व्यावसायिक चित्रपटांमध्ये सलमान-शाहरूखसोबत काम करायला मला नक्की आवडेल.

प्रश्न : ‘जंजीर’च्या रिमेकचा प्रस्ताव आला तेव्हा रिमेक म्हणून तो स्वीकारला का?
उत्तर : माझा पहिला प्रतिसाद असतो तो कथेला. त्यानंतर ती कथा सांगणारा दिग्दर्शक आणि मग माझी भूमिका. ‘जंजीर’च्या बाबतीत सांगायचं तर तो एका शैलीतला सिनेमा आहे. त्यात माझी जी भूमिका होती ती मूळ ‘जंजीर’ चित्रपटात नाही. त्यामुळे मी रिमेक करतोय पण भूमिकाच नाही अशी एक वेगळी उत्सुकता त्यामागे होती. शिवाय अपूर्व लाखियाने चित्रपटाला अगदी आधुनिक स्वरूप दिले आहे. रिमेकच्या बाबतीत माझं नेहमी असं म्हणणं आहे की तुम्हाला जुनी कथा पूर्ण नव्याने सांगता आली पाहिजे. नेमका हाच प्रयत्न अपूर्वने ‘जंजीर’च्या रिमेकमध्ये केलाय.
शिवाय या चित्रपटात मला कुठल्याही साध्या पत्रकाराची भूमिका दिली असती तरी चाललं असतं. पण अपूर्वने त्याला अलीकडेच ज्याची हत्या झाली त्या मुंबईतल्या एका इंग्रजी वर्तमानपत्रातल्या जे डे या पत्रकाराच्या व्यक्तिरेखेचा आधार दिलाय. त्यातून त्याला सांगायचं आहे ते मला फार महत्त्वाचं वाटतं. जे डेसारखा एखादा पत्रकार दुष्ट प्रवृत्तींसमोर उभं राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची काय अवस्था केली जाते याबद्दलचे सूचक विधान अपूर्वने या चित्रपटातून केलंय जे मला धाडसाचं वाटतं.

प्रश्न : इतकी र्वष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर चित्रपटांच्या बाबतीतला चोखंदळपणा फायदेशीर ठरतो का?
उत्तर : गेली तेरा र्वष मी चित्रपटांतून काम करतोय. सात भाषांमधील चित्रपट मी केलेत. आणि तरीही माझ्या चित्रपटांची संख्या काढली तर ती फार कमी आहे. मात्र इतकी र्वष चोखंदळ राहून मला जे चित्रपट मिळाले ते सगळेच चांगले होते हे पाहिल्यावर माझा चोखंदळपणा नक्कीच पथ्यावर पडलाय असं म्हणता येईल.

आमिरविषयी अतुल..
काही काही माणसं अशी असतात की त्यांच्याबरोबर दहा मिनिटे घालवली तरी तुम्ही काहीतरी शिकून बाहेर पडता. आमिर खान हा तसा माणूस आहे. त्याच्याबरोबर एकदा काम केलंत की प्रत्येक वेळी इतरांबरोबर काम करताना तुम्हाला त्याची आठवण होत राहते. खरं तर प्रत्येक वेळी गप्पा मारताना आमिर चित्रपटाविषयीच बोलतो असं नाही. पण त्याला प्रत्येक गोष्टीचं इतकं ज्ञान आणि माहिती आहे म्हणजे चित्रपट निर्मितीतला प्रत्येक घटक मग अगदी वितरण, विपणन ते दिग्दर्शन, पटकथालेखन, संगीत प्रत्येकाची त्याला खोल जाण आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर असणं आणि काम करणं हा आपल्या दृष्टीने परिपूर्ण अनुभव असतो. माझं भाग्य असं एक संपूर्ण चित्रपट मी त्याच्याबरोबर केला जो त्याच्या कारकिर्दीतीलही महत्त्वाचा चित्रपट होता. सुदैवाने त्याच्याबरोबरची माझी मैत्री ही त्या चित्रपटानंतरही टिकून आहे. आम्ही आजही भेटतो, गप्पा मारतो. त्यामुळे त्याच्या सहवासातला आनंद मला अजूनही मिळतो आहे. मी रोजच्या रोज त्याच्याकडून काही नवं शिकतोय. असा एखादाच माणूस आपल्याकडे असतो. आमिर हा आपल्या चित्रपटसृष्टीतला तसा एकमेव माणूस आहे.

दिग्दर्शकांना श्रेय
एकाच वेळी हिंदी-मराठी रुपेरी पडद्यावर मोठमोठय़ा नटांबरोबर, दिग्दर्शकांबरोबर काम करणं, त्याच वेळी छोटय़ा पडद्यावरही आपलं वेगळं अस्तित्व जाणवेल अशा पद्धतीची मालिका करणं या सगळ्या गोष्टी अतुलला त्याच्या चोखंदळपणातून साध्य झाल्या. मात्र आपल्या यशाचं श्रेय अतुल आपल्या दिग्दर्शकांना देतो. मी अत्यंत नशीबवान आहे की माझ्या दिग्दर्शकांनी मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला दिल्यात. एक नट म्हणून त्यांचा माझ्यावरचा जो विश्वास आहे तेच माझं समाधान आहे असं अतुल म्हणतो. अतुलचं हेच समाधान त्याला प्रेक्षकांचीही दाद मिळवून देतं आणि त्याच्यावरचं त्यांचं प्रेमही दर चित्रपटागणिक वृद्धिंगत होत जातं.