अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आय सी ८१४: कंदहार हायजॅक’ ही वेबसीरिज २९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा, अरविंद स्वामी, पत्रलेख आणि अभिनेता विजय वर्माने यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. २४ डिसेंबर १९९९ रोजी पाच दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सचं एक विमान नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीला जाणारं विमान उड्डाण केल्यानंतर ४० मिनिटांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दहशतवाद्यांनी ते विमान अमृतसर, लाहोर, दुबई असा प्रवास करून कंदहारला नेलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इब्राहिम अथर, सनी अहमद काझी, झहूर इब्राहिम, शाहिद अख्तर आणि सय्यद शाकीर या पाच दहशतवाद्यांनी या विमानाचं अपहरण केलं होतं. त्यांनी विमानातील प्रवासी व क्रू सदस्यांना आठ दिवस ओलिस ठेवलं होतं. विमानातील प्रवाशांना मुक्त करण्याच्या बदल्यात अपहरणकर्त्यांनी भारत सरकारकडे दहशतवादी मसूद अझहर, उमर शेख आणि मुश्ताक अहमद जरगर या तीन दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली होती. प्रवासी व विमानाच्या बदल्यात तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री जसवंत सिंह हे त्या दहशतवाद्यांना विशेष विमानाने कंदहारला घेऊन गेले. तिथे ओलिस ठेवलेले प्रवासी व क्रू आणि अतिरेकी यांच्यामध्ये देवाणघेवाण झाली.

अपहरणकर्त्या दहशतवाद्यांकडून कोडनेमचा वापर

अपरहणकर्त्यांनी हा कटादरम्यान एकमेकांसाठी विशिष्ट नावं (कोडनेम) वापरली होती. ते एकमेकांना बर्गर, डॉक्टर, चीफ, भोला व शंकर या नावांनी हाक मारायचे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या वेबसिरीजमध्ये हीच नावं वापरली. मात्र काही लोकांनी व हिंदुत्त्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे.

हे ही वाचा >> ‘ही’ लोकप्रिय मराठी अभिनेत्री ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या ‘देवरा’ चित्रपटात झळकणार, फोटो केले शेअर

या विमानातील एक प्रवासी कोल्लाट्टू रविकुमार यांनी २००० साली रेडिफवर विमान अपहरणाच्या घटनेची माहिती दिली होती. त्यातही त्यांनी सांगितलं होतं की, “अपहरणकर्त्यांपैकी दोघांना भोला व शंकर या नावांनी हाक मारत होते”. रवीकुमार यांनी म्हटलं होतं की “अपहरणकर्त्यांच्या टोळीचा म्होरक्या उंचपुरा होता, जो नेहमी विमानाच्या कॉकपिटमध्ये असायचा. त्याचं वय ४० वर्षांच्या आसपास असावं. तसेच इतर चौघांची नावं बर्गर, डॉक्टर, भोला व शंकर अशी होती”.

हे ही वाचा >> The Buckingham Murders : लहान मुलाचा खून अन् ५ संशयित! खऱ्या आरोपीला कसं शोधणार करीना कपूर? पाहा ट्रेलर

प्रवाशाने सांगितला अनुभव

रवीकुमार यांनी म्हटलं आहे की “भोला नेहमी संतापलेला असायचा. तर शंकर एखाद्या कमांडोसारखा होता. परंतु, त्यांच्यापैकी डॉक्टर हा स्वभावाने चांगला व शांत होता. तसेच बर्गरने आमची माफी मागितली होती. तो विमानातून निघताना आम्हाला म्हणाला, ‘आम्हाला माफ करा, आमच्यामुळे तुम्ही इथे अडकलेले आहात. आमचा तुमच्यावर कोणताही वैयक्तिक राग नाही. आम्ही आमचं काम करतोय’. कंदहारमध्ये भारत सरकार आणि अपहरणकर्त्यांमध्ये ज्या वाटाघाटी चालू होत्या, त्याची माहिती आम्हाला भोला आणि बर्गरकडून मिळायची. ते आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायचे. भारत सरकारला आम्हाला वाचवण्यात अजिबात रस नसल्याचं ते दोघे सांगायचे”.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ic 814 the kandahar hijack survivor described terrorists bhola was angry shankar commando asc