महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या आगामी प्रदर्शित होणाऱ्या बहुभाषिक चित्रपटाला आपला आवाज (व्हाईस ओव्हर) दिला आहे. हा चित्रपट मराठी, हिंदीसह एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग म्हणून अभिनेते सुबोध भावे यांनी राज ठाकरेंची खुली मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीतून राज ठाकरेंनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुमचा जन्म झाला असता तर तुम्हाला कोण व्हायला आवडलं असतं? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी मन जिंकणारं उत्तर दिलं आहे. मला शिवाजी महाराजांचा घोडाही व्हायला आवडलं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
शिवाजी महाराजांच्या काळात तुम्ही त्यांचे शिलेदार असता तर तुम्ही कोण असता? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, “मला शिवाजी महाराजांचा घोडाही व्हायला आवडलं असतं. कोण व्हायला हवं? याविषयी आपण काही बोलू नाही शकत. पण मला आजही असं वाटतं की, आपण शिवाजी महाराजांच्या काळात असायला हवं होतं आणि महाराजांचा एकदा स्पर्श व्हायला पाहिजे होता, असं मला आजही वाटतं, अशा भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा- “…तर मी तिरळाच झालो असतो” राज ठाकरेंनी सांगितला चित्रपटाला ‘व्हाईस ओव्हर’ देतानाचा ‘किस्सा’
दरम्यान, राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पडलेल्या एका स्वप्नाचाही उल्लेख केला आहे. एक जुना किस्सा सांगताना राज ठाकरे म्हणाले, मी एकदा बाबासाहेब पुरंदरे यांना एक प्रश्न विचारला होता, तुम्ही इतक्या वर्षांपासून शिवचरित्र सांगत आहात, तुमच्या स्वप्नात कधी शिवाजी महाराज आले आहेत का? यावर बाबासाहेब पुरंदरे मला म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतका इतिहास माहीत असल्याने तोच नेहमी डोक्यात घुमत असतो. माझ्या स्वप्नात…, शिवाजी महाराज एकेदिवशी लाल किल्ल्यावर आले होते. रात्रीचे दोन-अडीच वाजले असतील. रमझानचा महिना होता. त्यामुळे शाहिस्तेखानचे सेवक जेवण बनवत होते. यावेळी शिवाजी महाराज स्वयंपाक घरातून आतमध्ये शिरले होते. यावेळी मीही दाराजवळ उभा होतो. शाहिस्तेखानाच्या सेवकांना मारल्याशिवाय महाराजांना पुढे जाता येणार नाही, असं मला वाटलं. यावेळी महाराजांनी माझ्या पाठिला हात लावला आणि म्हणाले ‘पुढे व्हा’… यानंतर मी दचकून झोपेतून उठलो” असा प्रसंग राज ठाकरेंनी सांगितला आहे.