फ्लोरिडातील टम्पा बे येथे अलिकडेच पार पडलेल्या ‘आयफा पुरस्कार सोहळ्यात’ आनंद राय यांच्या ‘रांझना’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण केलेल्या अभिनेता धनुषला कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रेक्षकांनी बोलूच दिले नाही. ‘कोलावरी डी’ हे धनुषचे प्रसिध्द गाणे त्याच्या तोंडून चाहत्यांना ऐकायचे होते आणि त्यासाठी ते सतत धनुषकडे अाग्रह करत राहिले.
तीन वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याने सर्वत्र कमालीचा धुमाकूळ घातला होता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठावर हेच गाणे होते. हे गाणे धुनषने स्वत: लिहिले असून, त्याने स्वत:चं ते गायलेदेखील आहे. आजही हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे, हे पाहून धनुष भारावून गेला. याविषयीच्या टि्वटमध्ये तो म्हणतो, ‘प्रेक्षकांनी मला बोलूच दिलं नाही. मी ‘कोलावरी’ गाणे गावे यासाठी प्रेक्षकांनी आग्रह धरला… गाण्याच्या काही ओळी गाणे भाग पडले…’


धनुषने ‘रांझना’ चित्रपटासाठी उत्कृष्ट पदार्पण (Best Male debut) पुरस्कार पटकावला. यावेळी तो पत्नी ऐश्वर्यासह उपस्थित होता. ‘रांझना’च्या यशानंतर धनुष आनंद राय यांच्या आगामी चित्रपटासाठी करारबद्ध झाला आहे. सध्या तो आर. बाल्की दिग्दर्शित करत असलेल्या एका अनाम चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे, ज्यात महानायक अमिताभ बच्चन आणि कमल हसनची मुलगी अक्षरासुद्धा आहेत.

Story img Loader