बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांना आयफा पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाकरिता शत्रुघ्न यांना हा पुरस्कार त्यांचीच मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दबंग अभिनेत्री सोनाक्षीसोबत अभिनेता अनिल कपूरही मंचावर उपस्थित होते. शत्रुघ्न यांनी २०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांसह पंजाबी आणि बांगला चित्रपटातही काम केले. यावेळी, त्यांनी हा पुरस्कार बिहार आणि पटना येथील सर्वसामान्य लोकाना समर्पित केला. सिन्हा म्हणाले की, माझी जन्मभूमी असलेले पटना शहर माझी शक्ती आहे. लोकांचे प्रेम आणि आपुलकी यामुळेच आज मी इथे उभा आहे. तसेच, एनडीए सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून कार्यरत असलेले शत्रुघ्न यांनी तरुण पिढीला अमली पदार्थ आणि तंबाखू यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.