सोळाव्या आयफा चित्रपट पुरस्कारांमध्ये शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ नाटकाचे पुनर्कथन असलेला विशाल भारद्वाज यांचा ‘हैदर’ व विकास बहल यांचा ‘क्वीन’ या दोन चित्रपटांनी बाजी मारली आहे. दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी तीन पुरस्कार पटकावले असून त्यात कंगना राणावत उत्कृष्ट अभिनेत्री तर शाहीद कपूर हा उत्कृष्ट अभिनेता ठरला आहे.
‘क्वीन’ ही प्रियकराने नाकारलेल्या मध्यमवर्गीय घरातील मुलीच्या स्वशोधाची कहाणी असून कंगना राणावत हिची त्या भूमिकेसाठी प्रशंसा झाली आहे. तिला याच भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. कंगना पुरस्कार स्वीकारण्यास उपस्थित नव्हती. शाहीद कपूरने आपल्याच आप्तस्वकीयांनी धोका दिलेल्या माणसाची भूमिका केली असून त्याने त्याचा पुरस्कार विशाल भारद्वाज यांना अर्पण केला आहे. हा चित्रपट भीतीदायक असल्याचे शाहीद कपूरने सांगितले.
‘हैदर’ चित्रपटात शाहीदच्या आईच्या भूमिकेसाठी तब्बूला उत्कृष्ट सह अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे, तर सह कलाकार के.के मेनन याला उत्कृष्ट नकारात्मक भूमिकेचा पुरस्कार मिळाला आहे. त्याने चलाख राजकीय नेत्याची भूमिका केली आहे. अनुराग कश्यप हे ‘क्वीन’ चित्रपटाचे एक निर्माते व संपादक असून त्यांनी उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार स्वीकारताना दिग्दर्शक राजू हिराणी यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
हिराणी यांना आमीर खानची भूमिका असलेल्या ‘पीके’ चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे. ‘वुमन ऑफ द इयर’ पुरस्कार दीपिका पदुकोण हिने पटकावला; तिने तो पुरस्कार जगातील महिलांना अर्पण केला. भारतीय चित्रपटातील कामगिरीसाठी सुभाष घई यांचा गौरव करण्यात आला. ही एक अविस्मरणीय सायंकाळ होती, यश व पुरस्कार हे सापळे असतात, तुमच्या कामासाठी ते दिले जातात पण नंतर तुमच्याकडून आणखी चांगल्या कामाची अपेक्षा असते. ‘राम लखन’मधील जॅकी श्रॉफ व अनिल कपूर यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
आयफा पुरस्कारात ‘हैदर’, ‘क्वीन’ चित्रपटांची बाजी
सोळाव्या आयफा चित्रपट पुरस्कारांमध्ये शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ नाटकाचे पुनर्कथन असलेला विशाल भारद्वाज यांचा ‘हैदर’ व विकास बहल यांचा ‘क्वीन’ या दोन चित्रपटांनी बाजी मारली आहे.
First published on: 09-06-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iifa 2015 shahid kapoor kangana ranaut haider win big