संगीतकार युवान शंकर राजा आज त्यांचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या सर्व शुभेच्छांपैकी युवानचे वडील आणि ज्येष्ठ तमिळ संगीतकार इलैयाराजा यांनी दिलेल्या शुभेच्छानी सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं.
एक व्हिडीओ शेअर करत इलैयाराजा म्हणाले, “एकेकाळी पोल्लाची येथील अलियार धरणाजवळ जाऊन गाणी म्हणायची मला सवय होती. दोन-तीन चित्रपटांची गाणी लिहिण्यासाठी मी तिथल्या गेस्ट हाऊसमध्ये राहायचो. दिग्दर्शक महेंद्रन आणि केआरजी (निर्माते केआर गंगाधरन) मला अशाच एका सत्रासाठी तिथे घेऊन गेले होते. मी आणि माझी टीम रोज गाणी कम्पोज करत होतो आणि केआरजीचे घर कोईम्बतूरमध्ये असल्याने ते कधीकधी घरी जायचे. एके दिवशी संध्याकाळी ते घरून परत आले आणि मला म्हणाले, ‘अरे, तुझ्या बायकोला मुलगा झाला आहे.’ तेव्हाही मी माझ्या पत्नीसोबत राहून तिची काळजी घेण्याऐवजी गाणी कंपोज करण्यात व्यग्र होतो. माझ्या कामाबद्दल तिलाही फारशी हरकत नव्हती. जेव्हा मला युवानच्या जन्माची बातमी मिळाली, तेव्हा मी रजनी सरांच्या ‘जॉनी’ चित्रपटातील ‘सेनोरिटा आय लव्ह यू’ हे गाणे तयार करत होतो आणि त्या दिवशी जो माझा मुलगा जन्मला तो युवान! वाढदिवसाच्या शुभेच्छा, युवान.”
‘सेनोरिटा आय लव्ह यू’ हे इलैयाराजा यांनी संगीतबद्ध केलेल्या हजारो हिट गाण्यांपैकी एक आहे. दिवंगत गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांनी ते गायले होते. हे गाणे इलैयाराजाचा धाकटा भाऊ गंगाई अमरन याने लिहिले होते. महेंद्रन दिग्दर्शित जॉनी चित्रपटात रजनीकांत, श्रीदेवी, दीपा, बालाजी आणि सुरुली राजानी यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.