तुमच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे असतात. त्या त्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर मागे वळून पुन्हा जुन्यात रमायचं आणि मग आताही तेच करावं का असे विचार करण्यात काहीही अर्थ नसतो. अभिनेत्री म्हणून मी माझ्या कारकिर्दीत मला जे जे चांगले चित्रपट करता आले ते ते मी केले. आता पुन्हा एकदा चांगले चित्रपट मिळतात का याचा विचार करायचा किंवा अजून चांगल्या भूमिका मिळतील अशा आशेने काम सुरु करायचं हे मला अजिबात पटत नाही. त्यामुळे माझ्या समकालीन अभिनेत्रींसारखं चित्रपटातून पुनरागमन वगैरे करण्यात रस नाही, असे स्पष्ट मत अभिनेत्री सोनाली बेंद्रेने ‘वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केले.
ं‘कलर्स’ वाहिनीच्या ‘मिशन सपने’ या रिअॅलिटी शोची सूत्रसंचालक म्हणून सोनाली बेंद्रे एका वेगळ्या भूमिकेत पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यानिमित्ताने बोलताना आपण याआधी परीक्षक म्हणून काम केलं आहे पण, एखादा शो सूत्रसंचलन करण्याची वेळ आपल्यावर कधी आली नव्हती. त्यामुळे एक वेगळी संधी म्हणून आपण या शोकडे पाहत असल्याचे सोनालीने यावेळी बोलताना सांगितले. ‘मिशन सपने’ या शोमध्ये बॉलिवूडच्या नावाजलेल्या कलाकारांनी एका सामान्य माणसाचे जीवन एका दिवसासाठी जगण्याचा अनुभव घेतला आहे. मग रणबीर कपूरने दिवसभर बटाटे वडे विकले आहेत तर सलमान खानने चक्क लोकांचे केस कापले आहेत. राम कपूरने दिवसभर टॅक्सी चालवली आहे. सिध्दार्थ मल्होत्राने दिवसभर भाजी विकण्याचा व्यवसाय केला आहे. यातून जमा झालेला पैसा त्या त्या विक्रेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. या शोची संकल्पनाच पूर्णत: वेगळी होती. एक कलाकार म्हणून मी या सगळ्यांशी कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने जोडलेली आहे. पण, त्यांच्यापेक्षा सामान्य माणसाच्या जगण्याशी या कलाकारांना जोडून देणं आणि स्वत:ही त्या अनुभवाचा भाग होणं हा विचार मला फार आवडला आणि म्हणूनच मी या शोचे सूत्रसंचलन करण्यासाठी होकार दिला, असे सोनालीने सांगितले.
लग्नानंतर संसार, मुलांच्या जबाबदाऱ्या यात रमलेल्या सोनालीने चित्रपटांकडे पुन्हा लक्ष वळवलेच नाही. कधीतरी जाहिराती, रिअॅलिटी शोची परीक्षक आणि आता ‘मिशन सपने’ या शोची सूत्रसंचालक अशा मोजक्याच कामातून ती समोर आली आहे. याबद्दल तिला विचारलं असता आपली प्राधान्यतत्वं ही काळानुसार बदलत राहतात. आज मी आई आहे. माझी मुलं हे माझं पहिलं प्राधान्य आहे. त्यांचं संगोपन करणं मला मनापासून आवडतं त्यामुळे त्यातून उरलेल्या वेळेत जे चांगलं करता येईल ते करण्यावर माझा भर असतो, असं तिने सांगितलं.
सध्या सोनालीबरोबरच्या समकालीन अभिनेत्री रविना टंडन, शिल्पा शेट्टी, मनिषा कोईराला या चित्रपटांमधून पुन्हा काम करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अगदी माधुरी आणि श्रीदेवीनेही पुनरागमन केलं आहे. मग तुला पुन्हा चित्रपटांमधून काम करावंसं वाटत नाही का? यावर तिला अजिबात पुनरागमनात रस नसल्याचे तिने स्पष्ट केले. तुम्ही जेव्हा तुमच्या कारकिर्दीविषयी समाधानी नसता तेव्हाच तुम्हाला पुन्हा तेच काम नव्याने करून पाहण्याची उत्सूकता वाटत असते. मी अभिनेत्री म्हणून जे चित्रपट केले त्याबद्दल आनंदी आहे. आता मला पुन्हा वेगळं काहीतरू क रून अभिनेत्री म्हणून स्वत:ला नव्याने सिध्द करायची गरज वाटत नसल्याचे तिने सांगितले. एखादीच अशी भूमिका असेल जी करावीशी वाटली तर करेनही पण, जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा चित्रपट करण्यात रस नाही, असे तिने यावेळी बोलताना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा