रेश्मा राईकवार
भयभूताच्या कल्पनेचा खेळ पडद्यावर रंगवत प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारा उत्तम भयपट मराठी प्रेक्षकांच्या वाटय़ाला तसा दुर्मीळच. मुळात भयपटांच्या वाटय़ाला निर्माते – दिग्दर्शक सहसा जात नाहीत. त्यासाठी उत्तम कथानकाबरोबरच त्याअनुषंगाने होणाऱ्या निर्मितीचा खर्चीक यत्न करायला निर्माते सहसा धजावत नाहीत. तोकडय़ा निर्मिती खर्चात किमानपक्षी तंत्रात तरी हसं होणार नाही याची काळजी घेत भयपटाची अनुभूती देण्याचा प्रयत्न निर्माते, लेखक-दिग्दर्शक महेश नेने यांनी ‘डाक’ या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.
‘डाक’ चित्रपटाच्या पहिल्याच फ्रेममध्ये सूत्रधाराच्या तोंडून या चित्रपटाच्या शीर्षकाचा अर्थ आणि त्यावर आधारित कथा असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. आणि तरीही सुरुवातीला हा चित्रपट हत्या की आत्महत्या? यामागचे रहस्य उलगडण्यात गुंतवून ठेवणारी कथा आहे असं भासतं, मात्र एका वळणावर हा निव्वळ रहस्यपट नाही हे प्रेक्षकांच्या लक्षात येतं. गोपाळ नावाचा तरुण आयटी अभियंता नोकरी सोडून गावी परततो. गावातील जान्हवी नावाच्या तरुणीबरोबर त्याचा प्रेमविवाहही निश्चित ठरला आहे. आणि अचानक एके दिवशी गोपाळचा झाडाला लटकलेला मृतदेह दिसतो. कुठलेही कारण नसताना गोपाळने अचानक आत्महत्या करून जीवन का संपवले? हा प्रश्न त्याच्या घरच्यांच्या, त्याचा मुंबईतील मित्र रोहित आणि मैत्रीण सनाच्याही मनात शंकेचं घर करू लागतो. गोपाळच्या आत्महत्येमागचं रहस्य शोधून काढण्यासाठी सना आणि रोहित दोघंही पोलीस अधिकारी असल्याने ते त्याच्या गावी जाऊन तपास करायचं ठरवतात. मग गोपाळची हत्याच झाली आहे इथपासून ते त्याला त्रास देणाऱ्या सरपंचाच्या भावावर आलेला संशय असा हा घटनाक्रम पुढे जात राहतो. आणि एका टप्प्यावर तो ‘डाक’पर्यंत येऊन पोहोचतो. डाक ही माणसाच्या मृत्यूनंतर केली जाणारी चेटुकसदृश पूर्वापार प्रथा आहे आणि या प्रथेचा आधार घेऊन चित्रपटाची कथा रचण्यात आली आहे. आता या चित्रपटातलं भय नेमकं कोणाचं? गोपाळच्या मृत्यूमागचं रहस्य खरोखरच डाकच्या माध्यमातून उलगडतं का? हा सगळा खेळ पडद्यावर पाहणंच उचित ठरेल.
हेही वाचा >>>अभिनेत्री जुई गडकरीला चिडवतात ‘गाववाली’? का ते जाणून घ्या..
आधी उल्लेख केल्याप्रणाणे वरकरणी खुनामागचं रहस्य उलगडणारे वा त्याचा माग काढणारे कथानक चित्रपटात आहे असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात एका टप्प्यावर कथा पूर्णपणे वळण घेते. एरव्ही भयपटासाठी धक्कातंत्राचा वापर केला जातो. इथे सुरुवातीलाच डाक म्हणजे काय स्पष्ट करण्यात आलं आहे, त्यामुळे त्या प्रथेच्या अनुषंगाने आपसूकच एक गूढ वातावरण ध्वनिसंगीताच्या माध्यमातून सुरुवातीपासून करण्यात आलं आहे. मात्र हा भाग वगळला तरी एकीकडे रहस्यमय कथानक असल्याचं भासवणं आणि दुसरीकडे प्रत्येक गोष्ट सांगून सांगून प्रेक्षकांना दाखवणं असा परस्परविरोधी तरी सोपा मार्ग लेखक – दिग्दर्शकाने पत्करला आहे. त्यामुळे जिथे खरंच धक्कातंत्र प्रभावीपणे वापरण्याचा टप्पा येतो त्याआधीच सुज्ञ प्रेक्षकांना कथानकातील गोम लक्षात येते. इथे लेखनात आणि दिग्दर्शनातील कच्चे दुवे लक्षात आल्याशिवाय राहात नाही. मात्र जंगलात घडणाऱ्या गोष्टी, विशेषत: गोपाळत्या आत्महत्ये आधीच्या काही घटना उलगडणारा आणि रोहित-सना जंगलात असतानाचा भाग खूप प्रभावीपणे चित्रित झाला आहे. हा मोठा प्रसंग प्रेक्षकांना खिळवूनही ठेवतो आणि भयपटातील थरारही जाणवून देतो. असे आणखी काही प्रभावी प्रसंग चित्रपटात असायला हवे होते, असं वाटत राहतं. त्यासाठी मुळात काही फापटपसारा निश्चित आवरता आला असता.
एखादं गाव शापित असावं अशा पद्धतीने केलेलं संगीत संयोजन, त्या दृष्टीने केलेली मांडणी यामुळे गूढता निर्माण करण्यात यश आलं असलं तरी त्याला पूरक अशी वेगवान मांडणी चित्रपटात नाही. चित्रपटातला बराचसा भाग हा रोहित आणि सनाच्या गावभटकंतीत आणि प्रत्येकाकडे चौकशी करण्याची प्रक्रिया दाखवण्यात खर्ची पडला आहे. त्याऐवजी खूप उशिराने पडद्यावर येणाऱ्या डाकच्या दृश्यात्मक भागांवर अधिक भर देता आला असता. गावात फिरणाऱ्या वेडय़ा स्त्रीची व्यक्तिरेखाही अशीच अर्धवट सोडली आहे. ती नेमकी कोण? तिच्याकडे काही शक्ती आहे का? अशा कुठल्याच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. केवळ एका दृश्यात तिचा खूप सुंदर वापर करण्यात आला आहे. गोपाळच्या प्रेयसीच्या व्यक्तिरेखेलाही मर्यादित करण्यात आले आहे. सना आणि रोहितचं महत्त्व उत्तरोत्तर वाढवत नेलं आहे, मात्र खरं कर्तेपद शेवटाला भलत्याकडेच जातं. यालाच धक्कातंत्र म्हणत असावेत कदाचित. अश्विनी काळसेकर यांचा अभिनय उत्तम आहेच. त्यांची व्यक्तिरेखाही प्रभावी आहे, पण त्या व्यक्तिरेखेचा दरारा उत्तरार्धात एका क्षणी उसळल्यासारखा प्रेक्षकांसमोर येतो. प्रणाली धुमाळ, गुरू दिवेकर, सिद्धांत मुळय़े, वेदांगी कुलकर्णी असे तुलनेने नवे कलाकार चित्रपटात असले तरी त्यांनी आपल्या परीने या व्यक्तिरेखांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची लांबी आटोपशीर असणे हेही या भयकथेच्या पथ्यावर पडले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून संदेश देणं हे ठीक आहे, पण म्हणून भयपटासाठीही असं ओढूनताणून कारण देण्यापेक्षा त्यातली रंजकता वाढवण्यावर अधिक भर दिला असता तर ‘डाक’ पाहण्यातली गंमत अधिक वाढली असती.
डाक
दिग्दर्शक – महेश नेने, कलाकार – अश्विनी काळसेकर, संजीवनी जाधव, अनिकेत केळकर, प्रणाली धुमाळ, गुरू दिवेकर, सिद्धांत मुळय़े, ओम राणे, भूमी शिरोडकर, वेदांगी कुलकर्णी, जनार्दन कदम आणि कीर्ती आडारकर.