दिलीप ठाकूर
चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रेक्षकांनी पूर्णपणे नाकारलेले चित्रपट देखील काही गोष्टींची चर्चा करण्यास कारणीभूत ठरलेत, म्हणजेच अपयशातून काही धडा घ्यायचा असतो. शशी कपूर, संजीवकुमार, अमिताभ बच्चन व रेखा हे प्रमुख भूमिकेत आणि जोडीला अपर्णा सेन, हेलन, अमरिश पुरी, उत्पल दत्त, डाॅ. श्रीराम लागू व प्रेम चोप्रा अशी जबरदस्त स्टार कास्ट आणि सलिम-जावेदची पटकथा व संवाद इतके सगळे असताना प्रेक्षक असा चित्रपट नाकारतीलच कसे?

पण म्हणतात ना, प्रेक्षकांना कधीच गृहित धरु नये. तसेच काहीसे ‘इमान धरम ‘(१९७७) या चित्रपटाबाबत झाले आणि अमिताभ ऐन भरात असतानाच हा चित्रपट कोसळला. मुंबईत त्याचे मुख्य चित्रपटगृह नाॅव्हेल्टी होते. पहिल्याच दिवशी पब्लिक रिपोर्ट ‘पिक्चर मे दम नही’ असा येताच, सोमवारपासून करंट बुकिंगची खिडकी उघडली तरी फारसे प्रेक्षक येईनात. बरं, पिक्चर फ्लाॅप झाला वगैरे ठीक आहे. पण नंतर काही गाॅसिप्स मॅगझिननी त्याची केलेली चिरफाड बरेच दिवस चर्चेत राहिली. तीच गोष्ट महत्त्वाची आहे.

पटकथाकार सलिम-जावेद या जोडीचे फक्त ‘आखरी डाव’, ‘इमान धरम’ आणि ‘जमाना’ हे चित्रपट फ्लाॅप झाले. पण ‘इमान धरम’च्या फ्लाॅपने दिग्दर्शक मनमोहन देसाई व प्रकाश मेहरा यांच्या मुलाखती गाजल्या. दोघेही तसे कमालीचे फटकळ. खरं तर या दोघांनी सलिम-जावेदच्या पटकथेवर चित्रपट केलेत. मेहरानी ‘जंजीर’, ‘हाथ की सफाई’ तर मनजीनी ‘चाचा भतीजा’ सलिम-जावेदच्या पटकथेवर दिग्दर्शित केले आणि सुपर हिटही झाले. तरी त्यानी सलिम-जावेदची साथ का सोडली? चित्रपटाचे जग म्हणजे, सुपर हिट टीम कायम ठेवणे. हा अलिखित नियम का बरे मोडला? सलिम-जावेद एकत्र असल्याचा तो काळ असूनही या दिग्दर्शकांनी आपल्या अन्य हुकमी पटकथाकारांवर विश्वास का ठेवला?

‘इमान धरम’ फ्लाॅप ठरताच या प्रश्नांची उत्तरे मिळाली. तीच तर महत्त्वपूर्ण असतात. सलिम-जावेद यांचा असा दावा असे की, आमची पटकथा अशी व इतकी बंदिस्त असते की प्रत्येक पानावर दृश्य कसे चित्रीत करायचे याच्या सूचना असतात. दिग्दर्शकानी फक्त ते फाॅलो करायचे. मनजी व मेहरा यावरुनच दुखावले आणि त्यातूनच नवा वाद निर्माण झाला की, इतके आहे तर दिग्दर्शक देश मुखर्जी ‘इमान धरम’च्या दिग्दर्शनात यशस्वी का ठरले नाहीत? बरेच दिवस हा वाद गाजल्याने काही अपयशी चित्रपट काही गोष्टी समोर आणतात हे पुन्हा अधोरेखित झाले .

‘इमान धरम’चे निर्माते प्रेमजी यानी ‘दुश्मन’, ‘दोस्त’ ‘मजबूर’ अशा काही सुपर हिट चित्रपटाची निर्मिती केलेली. ‘मजबूर’ सलिम-जावेदचाच होता. प्रेमजीनी ‘इमान धरम’साठी कला दिग्दर्शक देश मुखर्जीला चित्रपट दिग्दर्शनाची मोठीच संधी दिली. चित्रपटातील एक दोन गोष्टी उल्लेखनीय आहेत. रेखाची दुर्गाची भूमिका. तात्कालिक समिक्षकानी रेखाला पहिल्यांदाच अभिनयासाठी दाद दिली. हेलनचेही कौतुक झाले. कारण तिला व्यक्तिरेखा साकारायला मिळाली. तर आनंद बक्षी व लक्ष्मीकांत-प्यारेलाल या गीत-संगीतकार जोडीचे ‘कुंचम कुंचम’ हे गाणे वेगळे होते. मुकेश, महेंद्र कपूर व आशा भोसले असे अतिशय वेगळेच काॅम्बिनेशन या गाण्यात आहे. अपयशी ठरलेल्या चित्रपटातही काही चांगल्या गोष्टी असतात आणि कधी हेच अपयश नवीन गुद्दे-मुद्देही समोर आणते. जबरदस्त मल्टी स्टार कास्ट असूनही ‘इमान धरम’ रसिकांकडून नाकारला गेला हा केवढा मोठा धक्का.