गायत्री हसबनीस

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम मराठी वाहिनीवर सुरू झाला आणि अल्पावधीत या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचा आलेखही उंचावत गेला. आता ‘कोण होणार करोडपती’चे तिसरे पर्व उद्यापासून ‘सोनी मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे आणि पुन्हा एकदा प्रख्यात अभिनेते सचिन खेडेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. यानिमित्ताने, अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधता आला.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमातील सूत्रसंचालनाच्या निमित्ताने एक नट म्हणून माझ्या लक्षात आलेली बाब ही की आपल्याला प्रेक्षक हे कुठल्यातरी एका प्रतिमेतून पाहत असतात. उदाहरणार्थ, तुमचं या नाटकातील काम आवडलं होतं किंवा या चित्रपटातील काम आवडलं होतं, असं ते सांगतात, पण व्यक्तिगत सचिन खेडेकर म्हणून कसे आहेत हे खरंतर प्रेक्षकांसमोर आणण्याची ही एक चांगली संधी आहे असं मला वाटतं. कारण ‘कोण होणार करोडपती’च्या सूत्रसंचालनाच्या या प्रक्रियेत माझ्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू प्रेक्षकांसमोर येत असतात. इथे माझी भूमिका ही प्रश्नकर्त्यांची असली तरी स्पर्धकांशी अनेकदा संवाद साधताना, किंबहुना त्यांच्याशी त्यांच्याबद्दलच्याच अनेक गोष्टी जाणून घेताना मलाही भावुक व्हायला होते, त्यांनी सांगितलेल्या प्रसंगांनी मन हेलावून जातं,  कधीकधी विविध परिस्थितीवर ज्या पद्धतीने प्रयत्नपूर्वक मात करून ही माणसं येथवर येतात, त्यांच्या त्या साहसाचे, प्रयत्नांचे मला सदैव कौतुकही वाटत राहतं आणि विशेष म्हणजे इतकी पर्व केल्यानंतर प्रत्येक पर्वानंतर मला माझ्यातच काहीतरी बदललंय असंही वाटत राहतं, अशा शब्दांत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत शिरल्यानंतर आपल्यात जाणवणारा बदल याबद्दलचा अनुभव सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला.

आता पुन्हा एकदा ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असून पुन्हा एकदा अभिनेते सचिन खेडेकर आपल्या नेहमीच्या शैलीत प्रश्नकर्त्यांची, संवादकाची भूमिका बजावताना दिसणार आहेत. यानिमित्ताने कथाबाह्य कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठीही एकंदरीत कशा पद्धतीने पूर्वतयारी करावी लागते, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. ‘कोण होणार करोडपती’ या ‘सोनी मराठी’वरील कथाबाह्य आणि सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी अभिनेते सचिन खेडेकर यांना पुन्हा एकदा लाभली असून येत्या सोमवारपासून करोडपतीचे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पर्वाच्या सुरुवातीलाच अनेक सुखद धक्के आणि कार्यक्रमाच्या संकल्पनेप्रमाणे ज्ञान आणि मनोरंजनाची अद्भुत भट्टी यंदाही रंगणार आहे. एक माणूस म्हणून प्रेक्षकांसमोर येण्याची ही नामी संधी आहे, असं खेडेकर म्हणतात. पण एकीकडे प्रश्नकर्ता म्हणून आपली जबाबदारी चोख निभवायची आणि दुसरीकडे समोर बसलेला स्पर्धक मग तो  इंजिनीअर असो, गृहिणी असो वा महाविद्यालयीन तरुण.. त्यांचे दडपण कमी करणं हेही कौशल्याने करावं लागतं, असं ते सांगतात.  या पर्वाच्या सुरुवातीच्या भागापासूनच ज्येष्ठ मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळणार असून लेखिका सुधा मूर्तीपासून अगदी तनुजा आणि काजोल या लोकप्रिय मायलेकींची जोडीही करोडपतीच्या व्यासपीठावर अवतरणार आहे. तसेच काही तांत्रिक बदलही या पर्वापासून सुरू करण्यात आले असून त्यापैकी फिफ्टी फिफ्टी ही लाइफलाइन बदलून त्याऐवजी प्रश्न बदलण्याची मुभा यावेळी स्पर्धकांना देण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

स्पर्धकच खरा आत्मा..

‘कोण होणार करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोची खासियतच अशी आहे की ठरल्याप्रमाणे साजेशा अशा सर्वच कलात्मक आणि तांत्रिक लहानमोठय़ा गोष्टी या कार्यक्रमाचा भाग राहतातच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम खुद्द स्पर्धकच तयार करत असतात. त्यांचा सहभाग हाच या कार्यक्रमाचा आत्मा आहे, असं ते ठामपणे सांगतात. 

दडपण कमी करणं हे एक कौशल्य

हॉट सीटवर बसलेला तो स्पर्धक प्रश्नोत्तरांच्या विळख्यात खरंतर इतका मानसिक दडपणाखाली असतो की त्याला नकळत शांत करणं, त्या दडपणातून मोकळं करत त्याला सहजगत्या खेळ खेळता यावा म्हणून करावा लागणारा संवाद यासाठी तुला काही एक कौशल्य असलंच पाहिजे, असं ते  मोकळेपणाने सांगतात.  मी स्वत: अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केलेले आहे, परंतु ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या आणि त्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनात जमीन-आसमानाचा फरक असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. ‘‘याचं कारण असं की कॅमेऱ्यासमोर बसलेल्या त्या स्पर्धकासह हा कार्यक्रम घराघरांत पाहणाऱ्या प्रेक्षकांना मला सूत्रसंचालक म्हणून सामोरं जायचं आहे. जिथे मी एका बाजूने प्रश्नकर्ता आहे, तर दुसऱ्या बाजूने स्पर्धकांकडून जुजबी माहिती काढून घेण्यासाठी म्हणून केलेले संभाषण या सर्वामध्ये मला त्यांना खूप घाबरवायचे नाही आणि खूप शांतही करायचे नाही आहे. अर्थात मी इथे पूर्णपणे प्रश्नकर्ता आहे, उर्वरित सगळय़ा खरंतर त्याला अनुसरून आलेल्या गोष्टी आहेत. या सगळय़ात खेळांत सोबतच येणारी अनेक व्यवधानं आहेत ज्यांचं भान राखत राखत स्पर्धकांना सोबत घेऊन मला पुढे जायचं आहे’’, असं ते सविस्तरपणे सांगतात. ‘‘प्रत्यक्ष सुरू असणाऱ्या या कार्यक्रमात अनेक व्यवधानही आहेतच, पण महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाची आब आणि गरिमा राखत खेळ रंगवणेही मोठे काम आहे’’, असंही ते पुढे प्रांजळपणे मांडतात.

मीही ‘करोडपती’चा प्रेक्षक..

‘‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम असा आहे की मी अगदी घरच्यांसह टीव्हीसमोर बसून न चुकता पाहतो’’, असंही सचिन खेडेकरांनी सांगितले. ‘‘त्याचं कारण असं की हा कथाबाह्य कार्यक्रम असल्याने काहीच ठरलेलं नसतं आणि तेव्हा सूत्रसंचालनादरम्यान मी त्या त्या वेळी कसा व्यक्त झालो हे पाहण्यात मला रस निर्माण होतो, किंबहुना त्यातूनही मी माझ्यात काय बदलू शकतो हे पाहण्याची इच्छा निर्माण होते’’, असे ते म्हणतात. ‘‘ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे तर असामान्यच आहेत पण. ते त्या असामान्यतेतून बाहेर येऊन सामान्यांशी त्याच्या पातळीवर येऊन सहजगत्या त्यांच्याबरोबर संवाद साधतात. मी सामान्यांतून आलेला एक कलाकार असल्याने खरंतर माझ्यासाठी ते सोप्पं जायला हवं, पण मला हेही सांगायला आवडेल की स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील ती आत्मीयता, त्यांची उत्सुकता, चौकसपणा, जिज्ञासा हेही त्यांच्यासमोर बसून आत्मसात करण्यातही एक मजा आहे’’, असा आपला अनुभवही त्यांनी मनमोकळेपणाने सांगितला.

एकाही प्रश्नाची पुनरावृत्ती नाही.

‘कोण होणार करोडपती’ हा एकमेव कार्यक्रम असेल जो फार कमी ट्रोल केला जातो, पण येथे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा साठाही अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणारा ठरतो. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे खरे अधिष्ठान ज्ञान हे आहे. माणसाकडून त्यांचं ज्ञान हे कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि जे या व्यासपीठावर प्रत्येकाच्या कामी येतं आणि जरी त्याचं बक्षीस मिळत असलं म्हणजे प्रत्येक प्रश्नामागे एक रक्कम मिळत असली तरी ती त्यांच्या हक्काची आहे हा भाव त्यात आहे आणि यामुळे या कार्यक्रमाचा करिश्मा आजही कायम आहे, असं ते म्हणतात. दुसरी एक फार मोठी गोष्ट आहे ती म्हणजे जवळपास बावीस वर्षे सलग सहा वेगवेगळय़ा भाषांमध्ये हा कार्यक्रम देशात सुरू आहे आणि त्यात ढीगभर प्रश्न काढले गेले ज्यात आजवर एकाही प्रश्नाची पुनरावृत्ती झाली नाही. अशा या प्रश्नांचा साठा बनवणाऱ्यांचा खरंतर खारीचा वाटा आहे, जी एक मुळात मोठी पूर्वतयारी असून या तयारीचा कालावधीही चारपाच महिन्यांचा आहे. ज्यामागे खूप अभ्यास आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचले आहे आणि इतर कथाबाह्य कार्यक्रमांपेक्षा वेगळा कार्यक्रम म्हणून ‘करोडपती’ हा कार्यक्रम गणला जातो आहे’’, असंही त्यांनी सप्ष्ट केलं.

Story img Loader