पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात इम्रान खान जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला जखम झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. तर हल्लेखोरास पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेवर आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
पाकिस्तानी कलाकार अली जाफरने ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो असं ट्विटमध्ये म्हणाला आहे, ‘मला शहीद मोहतरमा बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतरचे काळे, निराश दिवस आठवतात. देवाच्या कृपने इम्रान खानच्या बाबतीत काही गंभीर घडायला नको. काय घडले असेल याची कल्पनाही करता येत नाहीये, तीन चार गोळ्या लागूनदेखील इम्रान खान यांच्यात जे स्पिरिट आहे त्यावरून आम्हाला त्यांची गरज आहे.’ ट्विटच्या बरोबरीने त्याने इम्रान खान यांचा गोळीबाराच्या दरम्यानचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या घटनेवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफकडून (पीटीआय) पाकिस्तानमध्ये तातडीने निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करत आहे. याच मागणीला घेऊन लाहोर ते इस्लामाबादपर्यंत ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा ४ नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद येथे पोहोचणार होता. मात्र त्याआधीच वझिराबाद येथील जफर अली खान चौक येथे हा मोर्चा आल्यानंतर त्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.