श्रुती कदम
प्रस्थापित कलाकार-निर्माते- दिग्दर्शक यांची नवी पिढी हिंदी चित्रपटसृष्टीत विविध विभागात प्रवेश करती झाली आहे. अशीच एक नवीकोरी तिकडी असलेला ‘दोनो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध निर्माते – दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीशने केले आहे. तर सनी देओलचा धाकटा चिरंजीव राजवीर आणि पूनम धिल्लन यांची कन्या पलोमा या दोघांनी चित्रपटातून नायक-नायिका म्हणून पदार्पण केले आहे. संपूर्णपणे हिंदी चित्रपटातच रमलेल्या देओल कुटुंबातून आलेला राजवीर प्रादेशिक चित्रपट पाहण्यालाही प्राधान्य देतो. त्याला मराठी चित्रपट पाहायला आवडतात या गोष्टी नाही म्हटल्या तरी सुखद धक्का देऊन जातात. त्याच्या मते प्रादेशिक चित्रपट अधिक बोलके असतात.
‘दोनो’ चित्रपटाची कथा साधी-सरळ, रंजक पद्धतीची आहे. एका विवाह सोहळय़ात भेटलेले नायक- नायिका एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांच्यात फुलत जाणारे प्रेम आणि नात्याची ही कथा बडजात्यांच्या चित्रपट परंपरेला साजेशी अशी आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना राजवीरने त्याच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीविषयी आणि चित्रपटांच्या आवडीनिवडीविषयी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.
अभिनय जमणारच नाही..
अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला असला तरी लहानपणी आपल्याला अभिनय कधीच जमणार नाही असे मनात घट्ट बसले होते, असे त्याने सांगितले. ‘मी लहान असताना खूप लाजरा आणि शांत मुलगा होतो. त्यामुळे माझ्या आई – वडिलांना मी कधीच हे क्षेत्र निवडेन असे वाटले नव्हते. मी सहावीला असताना माझ्या शाळेतील नाटय़ शिक्षिकांनी मला एका नाटकात सहभागी होण्याविषयी सुचवले होते. त्यासाठी त्यांनी माझ्या वडिलांना शाळेत बोलावले. मला तेव्हा नाटकात एकेकच वाक्य होते. पण मी एवढा घाबरलो की काहीही करू शकलो नाही. तेव्हापासून आपल्याला अभिनय जमणार नाही हे मी ठरवले होते. पण हळूहळू माझा अभिनयातील रस वाढत गेला. मी अकरावी आणि बारावीला असताना थिएटर केले आणि तेव्हा मात्र मी अभिनय क्षेत्रातच काम करणार हे पक्के केले. त्यानंतर मी दोन वर्षांसाठी ‘एनएसडी’ ‘एफडीआय’च्या अभिनय कार्यशाळेत प्रशिक्षणही घेतले’ अशी आठवण राजवीरने सांगितली.
प्रेक्षक उत्तम चित्रपटासाठी वेळ काढतात..
‘दोनो’ या चित्रपटाची निवड प्रक्रिया आणि सध्याच्या प्रेक्षकांच्या आवडीबद्दल सांगताना राजवीर म्हणतो, ‘मी जेव्हा ही कथा पहिल्यांदा ऐकली तेव्हा माझे पात्र नक्की कसे आहे हे मी समजून घेतले. प्रत्येक चित्रपट हा काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे चित्रपट पाहताना प्रेक्षक त्या व्यक्तिरेखांच्या जागी स्वत:ला बघत असतात. प्रेक्षक चित्रपटासोबत जोडले जातात हे लक्षात घेत मी साकारणारे पात्र मला माझे आहे असे वाटत असेल तरच ते मी उत्तम प्रकारे करू शकेन असे मला वाटते’ अशी आपली भूमिका मांडतानाच ओटीटी असो वा चित्रपटगृह असो चित्रपट उत्तम असला पाहिजे तर प्रेक्षक तो पाहतात असे मत त्याने मांडले. ‘चित्रपट ओटीटीवर किंवा चित्रपटगृहात कुठेही प्रदर्शित झालेला असो तो उत्तम असेल तर प्रेक्षक तो पाहण्यासाठी वेळ काढतातच, असे तो सांगतो.
प्रादेशिक चित्रपटांकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते, पण ते चित्रपट खूप जास्त बोलके असल्याने आपल्याला अधिक आवडतात. मी मराठी चित्रपट आवडीने पाहतो. मला मराठीतला ‘कोर्ट’ हा चित्रपट फार आवडला होता. त्याचे सादरीकरण आणि मांडणी मला आवडली. मला जर कधी संधी मिळाली तर मी नक्की मराठी चित्रपटामध्ये काम करेन. -राजवीर देओल