कलाकार आणि त्यांच्या श्रद्धा हे समीकरण बॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीत पाहावयास मिळते. चित्रपट प्रदर्शनापूर्वी देवदर्शनाला जाणे, एखाद्या ठराविक अक्षरावरून चित्रपटाचे नाव ठेवणे अशा अनेक गोष्टी करताना कलाकार दिसतात. मात्र, असे काही न करता आपण निदान नास्तिक तरी नाही याची प्रचिती रितेश देशमुखने नुकतीच दिली. काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी ‘लय भारी’ चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा पार पाडला. यावेळी पांढरे शर्ट आणि त्यावर नेहरू जॅकेट परिधान केलेला रितेश दिमाखदार दिसत होता. छायाचित्रकारांनी जेव्हा त्याला स्टेजवर असलेल्या विठोबाच्या मूर्तीजवळ उभे राहण्यास सांगितले तेव्हा रितेशची धार्मिक बाजू सर्वांना दिसून आली. विठोबाच्या मूर्तीजवळ जाण्यापूर्वी त्याने आपले शूज एका कोप-यात काढून ठेवले आणि तो मूर्तीजवळ जाऊन उभा राहिला. रितेशभोवती असलेल्या त्याच्या चाहत्यांना आणि इतर प्रेक्षकांना त्याचा हा श्रद्धाळूपणा त्यावेळी पाहावयास मिळाला.
‘लय भारी’व्यतिरीक्त रितेशचा ‘एक व्हिलन’ हा चित्रपटात येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. यात तो पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारताना दिसेल. रितेशसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर यांच्याही चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader