गेल्या वर्षभरापासून कलाविश्वामध्ये अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकची चर्चा सुरु आहे. मात्र काही केल्या या बायोपिकची गाडी पुढे जाईना. आमिर , शाहरुख, प्रियांका, भूमी पेडणेकर अशा अनेक बड्या कलाकारांची नावं या चित्रपटाभोवती जोडली गेली. मात्र एकाही नावाची निश्चिती या चित्रपटासाठी झालेली नाही. आता या चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशलचं नाव निश्चित करण्याचा विचार निर्माते, दिग्दर्शक करत असल्याच्या चर्चा आहेत.

आमिर खान ही पहिली पसंती राकेश शर्माच्या बायोपिकसाठी होती. मात्र काही कारणानं आमिर खाननं या बायोपिकसाठी नकार दिला. आमिरनं या भूमिकेसाठी शाहरूखचं नाव सुचवलं त्यानंतर काही महिन्यांपासून शाहरूख ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र ‘डॉन ३’ साठी शाहरुखनं हा बायोपिक सोडला असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता दिग्दर्शकांनी अभिनेता विकी कौशलची निवड केल्याचं म्हटलं जातं आहे.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक्स’च्या यशामुळे अभिनेता विकी कौशलच्या लोकप्रियतेत वाढ झाली. बॉलिवूडमधल्या लोकप्रिय दहा अभिनेत्यांच्या यादीत विकी कौशलनं स्थान मिळवलं. विकीनं आपल्या अभिनयानं निर्माते रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांचं मन जिंकलं, त्यामुळे राकेश शर्मा यांची बायोपिक ‘सारे जहाँ से अच्छा’मध्ये विकीची निवड करण्याचं निर्मात्यानं निश्चित केल्याचं समजत आहे.

अद्यापही याबद्दलची अधिकृत घोषणा व्हायची आहे. या वर्षाअखेर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीसाठी प्रियांका चोप्रा, भूमी पेडणेकर आणि फातिमा सना शेख या तिघींच्या नावाचीही चर्चा सुरु आहे.

Story img Loader