सांगली : जन्माला आल्यानंतर प्राण्याला आईच्या दूधाअगोदर प्राणवायूची गरज भासते. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूसाठीच सह्याद्री देवराईची स्थापना आपण केली असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. कुंडल (ता.पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त क्रांतिअग्रणी पुरस्कार शिंदे यांना जेष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते व आमदार अरूण लाड यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र,शाल, श्रीफळ असे होते.
यावेळी शिंदे म्हणाले, आजवर मी ज्या भूमिका केल्या त्यातून समाजातील खदखद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण जगण्यासाठी लागणार्या ऑक्सिजननिर्मितीसाठीची खंत वाटत होती त्यासाठी सह्याद्री देवराई संस्था स्थापली. आपण आपल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी शुद्ध हवेचे स्रोत तयार करू या. पोटासाठी पैसा नव्हे तर अन्न गरजेचे असून त्यासाठी झाडे हवीत. डॉ. गवस म्हणाले, आजच्या पिढीला वृक्षांचे महत्व समजले नाही. ही पिढी कसले शिक्षण घेत आहे? या सगळ्यात सयाजी शिंदे हे वादळात दिवा लावत आहेत अशा माणसाला हा पुरस्कार प्रेरणा देईल. तुम्ही चाळण केलेल्या जमिनीला केवळ देशी वृक्षच वाचवू शकतात.
हेही वाचा : सांगली : औदुंबरमध्ये मिनीबस आगीत खाक
आ. लाड म्हणाले, चळवळीतून जे समाज घडवतात त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.डॉ. जी.डी. बापू लाड हे यांनी समाजासाठी दिलेले योगदान, त्यांनी केलेला त्याग नवीन पिढीला माहिती व्हावा म्हणून समाजात अलौकिक काम करणार्या व्यक्तींना क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. स्वागत व प्रास्ताविक अशोक पवार यांनी केले, मानपत्र वाचन डॉ.पी.बी. लाड यांनी केले, आभार अर्जुन कुंभार यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले.