प्राप्तीकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट देशात अनेक ठिकाणी धाडी टाकत असल्याच्या बातम्या येत असतात. त्यात राजकीय व्यक्तींबरोबर विविध व्यक्तींचा समावेश असतो. आता प्राप्तीकर विभागाने टॉलिवूड निर्मात्यांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेता रामचरणच्या सध्या चित्रपटगृहात सुरू असलेल्या ‘गेमचेंजर’ या सिनेमाच्या निर्मात्याचा समावेश आहे.
आयकर (IT) विभागाने टॉलिवूडमधील (तेलुगु सिनेसृष्टीतील) प्रसिद्ध निर्माते दिल राजू यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांसह छापे टाकले. या छाप्यांमध्ये दिल राजू यांच्या जुबली हिल्स आणि बंजारा हिल्स येथील निवासस्थाने आणि कार्यालयांवर छापे टाकले. ‘पुष्पा २’ च्या निर्माते नवीन यर्नेनी आणि रवी शंकर, हे ज्या मिथ्री मूवी मेकर्सच्या बॅनरखाली काम करतात, यांची कार्यालये आणि मालमत्ताही तपासण्यात आली, असे वृत्त ‘१२३ तेलुगु’ या वेबसाइटने दिले.
माध्यमांच्या अहवालानुसार, या कारवाईचा उद्देश आर्थिक अनियमितता आणि बेहिशेबी उत्पन्नाच्या आरोपांची चौकशी करणे हा आहे. छाप्यांचे नेमके निष्कर्ष अद्याप समोर आले नसले तरी, मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या प्रमाणातील आर्थिक व्यवहारांवर आयकर विभागाची नजर असल्याचे स्पष्ट होते.
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२१ जानेवारी २०२५) आयकर विभागाने प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिल राजू आणि इतर काही व्यक्तींशी संबंधित अनेक ठिकाणी करचुकवेपणाच्या आरोपांवरून छापे टाकले आहेत. काही इतर निर्माते आणि संबंधित व्यक्तींशी संबंधित ठिकाणीदेखील तपास सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल राजू, यांचे खरे नाव वी. वेंकट रामणा आहे, हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल राजू यांनी चित्रपट निर्मिती व वितरणामध्ये यश मिळवले आहे. त्यांनी आपल्या बॅनरखाली अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत, ज्यामध्ये ‘गेम चेंजर’ आणि ‘संक्रांतिकी वस्तुन्नाम’ यांसारख्या अलीकडील समावेश आहे.
दिल राजू हे तेलंगणा फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (TFDC) अध्यक्ष आहेत. त्यांच्या ‘गेम चेंजर’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. परंतु, वेंकटेश-स्टारर ‘संक्रांतिकी वस्तुन्नाम’ला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ब्लॉकबस्टर चित्रपटांचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे दिल राजू यांनी छाप्यांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. दिल राजू यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत, तसेच २०१३ मध्ये त्यांना नागी रेड्डी-चक्रपाणी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.