पुरब और पश्चिम सिनेमात इंग्रजांची भारतीयांप्रती असणारी मानसिकता बदलण्याचा मनोज कुमार यांनी केलेला प्रयत्न असो किंवा सनी देओल आणि त्याची संपूर्ण टीम १९९७ मध्ये बॉर्डर सिनेमातून देशाचे रक्षण करत असो बॉलिवूडमध्ये देशभक्तीपर सिनेमांची कधीच कमतरता नव्हती. या सिनेमांमधील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत जेवढी ती तेव्हा होती. या गाण्यांचे बोल इतके हृदयस्पर्शी आहेत की ही गाणी कधीही ऐकली तर मन भारावून जातं. भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई आणि महात्मा गांधी अशा हुताम्यांच्या देशात आपण जन्माला आल्याचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटेल.
तुम्हालाही स्वातंत्र्य दिनाचा हा फिल घ्यायचा असेल तर एकदा खाली दिलेली गाणी ऐकाच. आजच्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्टला भारत स्वातंत्र्य झाला होता. पण हे स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी शेकडो हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांचे स्मरण करताना आणि ही गाणी ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
मेरे देश की धर्ती- देशभक्तीशी निगडीत कोणती गाणी आठवतात का असा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला १९६७ मध्ये आलेल्या उपकार या सिनेमातील हे गाणे आठवल्याशिवाय राहणार नाही. देशभक्तीपर गीतांमध्ये या गाण्याचा आजही पहिला नंबर लागतो.
ये देश है वीर जवानों का- नया दौर सिनेमातील दिलीप कुमार, वैजयंतीमाला आणि अजीत यांच्यावर चित्रीत झालेले आणि मोहम्मद रफी आणि बलबीर यांनी गायलेले हे गाणे आजही तेवढेच प्रसिद्ध आहे. हे गाणं ऐकताना भारतीय संस्कृती आणि इथल्या वैविध्यपूर्ण परंपरा यांचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही. हे गाणं तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणतं.
ए मेरे वतन के लोगो- माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जेव्हा हे गाणे ऐकले होते तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणे अजरामरच राहणार यात काही शंका नाही. २७ जानेवारी १९६३ मध्ये लाल किल्यावर हे गाणे पहिल्यांदा गायले गेले होते. सी. रामचंद्र यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. कवी प्रदीप यांनी १९६२ मध्ये भारत- चीन युद्धात वीर- मरण आलेल्या भारतीय जवानांसाठी लिहिले होते.
हे प्रीत जहा की रीत सदा- १९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या पुरब और पश्चिम सिनेमातील हे गाणे आहे. मनोज कुमार यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं आजही तेवढ्याच तन्मयतेनं ऐकलं जातं. या गाण्यात मनोज कुमार भारतीयांनी लावलेल्या शोधामुळेच पाश्चात्य देश वेगवेगळ्या गोष्टी साध्य करु शकले हा आपला मुद्दा पटवून देताना दिसत आहेत.
मां तुझे सलाम- ए.आर. रेहमान हे नाव ऐकलं की सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतात. रेहमानचं हे गाणं तेव्हा इतकं गाजलं होतं की दिवसाला किमान दोनदा तरी हे गाणं टिव्हीवर आणि रेडिओवर लावलं जायचं. आजही या गाण्याची क्रेझ तिळमात्र कमी झालेली नाही.
ए मेरे प्यारे वतन- गुलझार यांनी लिहिलेलं हे गाणं मन्ना डे यांनी गायले होते. १९६१ मध्ये आलेल्या काबुलीवाला या सिनेमातील हे गाणे आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ऐकणाऱ्या गाण्यांच्या यादीत हे गाणं नक्कीच येतं.
कर चले हम फिदा- १९६५ मध्ये आलेल्या हकीकत या सिनेमातील हे गाणे आजही ऐकले तर डोळे नक्कीच पाणावतात. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गाणं जवानांच्या बलिदानाची आठवण करुन देतात.