अलीकडच्या काळात ‘बाहुबली’, ‘पुष्पा’, ‘सालार’, ‘कल्की 2898 एडी’ असे अनेक ‘पॅन इंडिया’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘पॅन इंडिया’ म्हणजेच एकच चित्रपट अनेक भाषांमध्ये तयार करून रिलीज करणे ही संकल्पना आता नवीन नाही. पण जवळपास ३५ वर्षांपूर्वी एका अभिनेत्याने एक ‘पॅन इंडिया’ चित्रपट आणला होता. ज्यासाठी त्याने तब्बल १० कोटी रुपये खर्च केले होते, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला आणि निर्माता दिवाळखोर झाला.
हा चित्रपट १९९१ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात रजनीकांत, नागार्जुनसारखे दिग्गज स्टार होते, पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही. दिवाळखोर निर्मात्यांला करिअर टिकवण्यासाठी ब्री ग्रेड सिनेमांचे रिमेक करावे लागले होते.
भारतातील सर्वात महागडा चित्रपट ठरलेला सुपरफ्लॉप
१९८८ मध्ये, कन्नड अभिनेते आणि चित्रपट निर्माते व्ही. रविचंद्रन यांनी एकच चित्रपट बऱ्याच भाषांमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाचं नाव ‘शांती क्रांती’. हा चित्रपट चित्रपट एकाच वेळी कन्नड, तमिळ, तेलगू आणि हिंदीमध्ये बनवण्यात आला होता. रविचंद्रन यांनी स्वतः या चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. कन्नडमध्ये त्यांनी स्वतः मुख्य भूमिका साकारली होती. तर तेलुगूमध्ये नागार्जुन मुख्य भूमिकेत होते. तमिळ आणि हिंदीमध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत होते. जुही चावला, खुशबू आणि अनंत नाग यांनी चारही भाषेतील चित्रपटांमध्ये इतर महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्याकाळी या चित्रपटाचे बजेट तब्बल १० कोटी रुपये होते, तो त्यावेळचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट होता. ८ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘अजूबा’पेक्षा जास्त खर्च ‘शांती क्रांती’च्या निर्मितीसाठी करण्यात आला होता.
‘शांती क्रांती’ सप्टेंबर १९९१ मध्ये कन्नड आणि तेलुगुमध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर दोन आठवड्यांनी तो इतर दोन भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात रजनीकांत, नागार्जुन आणि जुही हे तीन स्टार्स होते, पण कोणत्याच भाषेत या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळू शकली नाही. प्रॉडक्शनसाठी प्रचंड खर्च आला होता आणि चित्रपट मात्र काहीच कमवू शकला नाही. ‘शांती क्रांती’ने चार भाषांमधून फक्त ८ कोटी रुपये कमवले. हा त्याकाळचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट होता.
‘शांती क्रांती’ फ्लॉप झाल्याने रविचंद्रन झालेले दिवाळखोर
रविचंद्रन यांनी जवळ होती तेवढी सगळी बचत या चित्रपटाच्या निर्मितासाठी खर्च केली. इकंच नाही तर त्यांनी या चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट करण्यासाठी ५० एकरचा भूखंड खरेदी केला होता. तसेच व्हीएफक्स व भव्यदिव्य सेटसाठीही खूप पैसे खर्च करण्यात आले होते. त्यावेळी हा चित्रपट फ्लॉप झाल्याने रविचंद्रन यांचे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. या चित्रपटामुळे दिवाळखोर झाल्याचं रविचंद्रन म्हणाले होते. “या चित्रपटाच्या अपयशानंतर हिट तेलुगू व तमिळ चित्रपटाच्या रिमेकवर अवलंबून राहावं लागलं,” असं त्यांनी सांगितलं होतं. ९० च्या दशकात अशा बी-ग्रेड रिमेकमुळे रविचंद्रन यांचं करिअर टिकून राहिलं.