भारत विरुद्ध इंग्लडदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अगदी शेवटची काही षटकं शिल्लक असताना भारताने विजय मिळवला. शेवटच्या दिवसावर भारतीय गोलंदाजांनी छाप पाडली आणि भारताला विजय मिळवून दिला. आधी मोहम्मद शमीने अर्धशतकी खेळीच्या बळावर तळाच्या फलंदाजांना साथीला घेत इंग्लंडपुढे विजयासाठी ६० षटकांत २७२ धावांचे आव्हान ठेवले. मग मोहम्मद सिराज, जसप्रित बुमरासह भारताच्या वेगवान माऱ्याने इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांत गुंडाळत दुसऱ्या कसोटीत १५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार भारताचा सलामीचा फलंदाज के. एल. राहुलला देण्यात आलाय. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच अभिनेता सुनिल शेट्टीनेही ट्विटरवरुन आनंद व्यक्त करताना हटके पोस्ट केलीय.

नक्की वाचा >> Chutzpah शब्द वापरुन आनंद महिंद्रांनी केलं भारतीय संघाचं कौतुक, जाणून घ्या शब्दाचा अर्थ काय

भारताने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंच्या सेलिब्रेशनचा फोटो सुनिल शेट्टीने पोस्ट केलाय. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये मी या विजयामुळे थोडा वेड्यासारखा वागलो तर समजून घ्या असंही म्हटलंय. “ऐतिहासिक! भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी काय सुंदर भेट दिलीय. बॉइज इन ब्लूचा लॉर्ड्सवरील इंग्लंडवरील हा विजय कोणत्याही अर्थाने कमी नाहीय. हे भन्नाट आहे. मी एखाद्या दिवस थोडा वेड्यासारख्या वागलो तर मला समजून घ्या. सर्वच भारतीयांना असं वागण्याचा हक्क आहे म्हणा. भारतीय संघाचे आभार आणि खूप प्रेम,” असं सुनिल शेट्टीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याच सामन्याच्या पहिल्या दिवशी दमदार शतक झळकावणाऱ्या के. एल. राहुलचं सुनिल शेट्टीने खास शब्दात कौतुक केलं होतं. सुनील शेट्टीने इन्स्टाग्रामवर राहुल शतक साजरं करत असल्याची छोटी व्हिडीओ क्लिप शेअर केली होती. सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीचं नाव अनेकदा के. एल. राहुलशी जोडलं जातं. असं असतानाच सुनिल शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. राहुलचं हे शतक म्हणजे आपल्याला वाढदिवसाची भेट असल्याचं सुनिल शेट्टीनं म्हटलं होतं. “क्रिकेटच्या मक्केमध्ये शतक! अभिनंदन आणि देव तुझं भलं करो बाबा… माझ्या या बर्थ डे गिफ्टसाठी धन्यवाद,” अशी कॅप्शन सुनिल शेट्टीने या पोस्टला दिली होती.

या पोस्टवर के. एल. राहुलनेही हार्ट आणि मिठीचे इमोंजी पोस्ट करत प्रतिसाद दिला होता.